मंत्र्यांनो, म्हैशाळप्रकरणी राजीनामे द्या!

0

मुंबई। म्हैशाळ येथील अवैध गर्भपात होत असल्याप्रकरणी मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावर सर्व कामकाज बाजूला सारून चर्चेची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मात्र हा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी याप्रश्नी निवेदन करण्याची मागणी करत सभागृहात आरोग्यमंत्री, महिला व बाल कल्याण मंत्री आणि गृह राज्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

म्हैशाळप्रकरणी लक्षवेधी सूचना दाखल करून घेतल्याने त्याविषयीचा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत असल्याचे अध्यक्ष बागडे यांनी जाहीर केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी हा विषय गंभीर असून यावर तातडीने निवेदन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप केला.

त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप करत सरकार संवेदनशील असून याप्रकरणी योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. अर्थमंत्र्यांच्या या उत्तरावर हरकत घेत सभागृहात महिला व बाल कल्याण मंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री सभागृहात असून ते शांत आहेत. तुमचा या खात्याशी काय संबंध? असा सवाल केला. त्यावर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ मंत्री असल्याने आणि मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदारीने काम करत असल्याचे सांगितले. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनीही सरकारवर टीका करत सरकारने किमानपक्षी निवेदन तरी करावी, अशी मागणी केली.

ही घटना अत्यंत गंभीर आहे. राज्यात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. तपास योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच आणखी काही जणांना अटक केली जाईल. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, कोल्हापूर , मिरज आदी भागातील डॉक्टरांची साखळी काम करीत आहे.मी उद्या, 8 मार्च रोजी म्हैशाळ येथे भेट जाणार असून यानंतर पुढील तपासाबाबत सभगृहात निवेदन करणार आहे.
-डॉ.दीपक सावंत, आरोग्यमंत्री.

विरोधक-सत्ताधार्‍यांत जुंपली
प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याप्रकरणी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांनी त्यांना हा स्थगनचा विषय होत नाही असे सांगत खाली बसवण्याचा प्रयत्न करताना माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील बोलायला उठले. ते म्हणाले,जरी हा विषय स्थगनचा होत नसला तरी हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे यावर इतर कामकाज बाजूला ठेवून यावर सभागृहात चर्चा व्हावी. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. म्हैशाळ गावात गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला. याबाबत गृहमंत्र्यांनी तेथे भेट दिली का?सरकारने याबाबत कोणती कारवाई केली? यास महिला व बालकल्याण,गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री जबाबदार नाहीत का? असा सवाल केला.