मुख्यमंत्री आणि आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वय नाही: देवेंद्र फडणवीसांचा टोला

0

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आणि पनवेलचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला टोला देखील लगावला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. मी पहिल्या दिवसापासून मंत्री-मुख्यमंत्री आणि आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे सांगत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. उदाहरणा दाखल त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे उदाहरण दिले. ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक आयुक्तांच्या बदल्या झाल्या. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नगरविकास मंत्री आहेत, त्यांनाही याबाबत कल्पना नव्हती असे त्यांनी सांगितले.

सरकारचे नेमके प्राधान्य कशाला आहे? हेच कळत नाही असेही त्यांनी सांगितले.

आघाडीतील नेते सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत आहे, मात्र त्यांच्यातील मतभेद अनेकदा उघड झाले आहे. त्यांनी या काळात मुख्यमंत्र्यांसोबत उभे रहावे असा सल्लाही त्यांनी दिला.

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना सरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात काम होत नसल्याचे आरोप त्यांनी केले.

शासकीय रुग्णालयात जागा शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे सामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ येत आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे फार महाग असल्याने सामन्यांमध्ये चिंता असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांना केली आहे.

कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढलं पाहिजे. टेस्टिंग वाढवले नाही तर कोरोनाचे संक्रमण वाढत जाईल. सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. सरकारची व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया मंद गतीने सुरु आहे. एमएमआर रिजनमध्ये टेस्टिंगची व्यवस्था आणि आयसोलेशन तसेच उपचाराची व्यवस्था वाढवावी लागेल, कारण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Copy