मंत्रिमंडळ विस्ताराआधी चार मंत्र्यांना डच्चू

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज संध्याकाळी ६ वाजता विस्तार होणार आहे. राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अद्यापही मंत्र्यांच्या नावाची यादी अधिकृतपणे घोषित करण्यात आली नाही. मात्र दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी देण्यात आली असून, शपथविधी सोहळ्याआधी मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चूही देण्यात येत आहे. यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर संतोष गंगवार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात महिला व बाल विकास राज्यमंत्र्यांनाही राजीनामा घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येईल, अशी चर्चा मागील दोन तीन दिवसांपासून सुरू होती. त्याची सुरूवात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांपासून झाली. केंद्र सरकारने ८ राज्याचे राज्यपाल बदलत असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता केंद्रीय शिक्षणमंत्री हे मोदींच्या मंत्रिमंडळात नसतील. रमेश पोखरियाल निशंक यांनीही मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. करोनानंतर होत असलेल्या त्रासाचं कारण त्यांनी दिलं आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार आहे.

यातच आता महिला व बाल विकास खात्याच्या राज्यमंत्री देबश्री चौधरी यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते बरेली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातू डच्चू दिला जाण्याची शक्यता असलेल्या आणखी काही नावांचीही चर्चा सुरू आहे. यात सदानंद गौडा यांचाही राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.