मंत्रालयातील १४०० अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलीस सेवेत रुजू होण्याचे आदेश

0

मुंबई – पोलिसांवरील वाढलेला ताण लक्षात घेता त्यांच्या मदतीसाठी अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलिसांच्या मदतीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास १४०० कर्मचारी-अधिकार्‍यांना पोलीस सेवेत रुजू होण्यास सांगितले आहे. ज्यांचे वय ४० वर्षापेक्षा कमी आहे अशांना ३१ मे पर्यंत अथवा पुढील आदेश येईपर्यंत पोलीस आयुक्त, मुंबई यांच्यासाठी सेवा द्यावी लागणार आहे.

संबंधित कर्मचारी, अधिकारी यांना पोलीस आयुक्तांनी पोलीस स्टेशनला नियुक्ती द्यावी, त्यांना कामाचे वाटप करावे तसेच अन्य प्रशासकीय कामदेखील आवश्यकतेनुसार देण्यात यावीत असं परिपत्रकात म्हटलं आहे. या १४०० कर्मचारी अधिकार्‍यांनी पोलीस आयुक्तांच्या सांगण्यानुसार नेमणूक केलेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर व्हावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत त्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक आहे असे सांगण्यात आले आहे. तसेच जे कोणी अधिकारी, कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांची माहिती तात्काळ सामान्य प्रशासन विभागाकडे पोलीस आयुक्तांनी कळवावी. अशा कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल तसेच कायदेशीर कारवाईही करण्यात येईल असा इशारा राज्य सरकारने कर्मचार्‍यांना दिला आहे.

Copy