मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी उधळले कडधान्य

0
हमीभावाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, १० जणांना अटक 
मुंबई : आश्वासन देऊनही हमीभावाच्या नावावर केवळ फसवणूक होत असल्याचा आरोप करत शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद सोमवारी मंत्रालयासमोर उमटले. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचे आश्वासन सरकारने दिले, परंतु त्याची अंमलबजावणी केली नसल्याने या विरोधात आज मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी तूर, हरभरे, सोयाबीन, मूग आदी कडधान्य उधळून सरकारच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला. शेतकऱयांच्या मालाला हमी भाव द्यावा अशा अनेक घोषणा करत शेतकऱ्यांनी मंत्रालयाचा परिसर दणाणून सोडला. घोषणा आणि कडधान्याची उधळण करणाऱ्या शेतकऱयांना पोलिसांनी अटक केली. यात महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता.
छावा युवा महासंघ या संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील  यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले गेले यात पुणे जिल्ह्यातील 70 च्या दरम्यान आंदोलक आले होते, त्यापैकी सुमारे 10 जणांची मंत्रालयाच्या समोर आंदोलन करताना  पोलीसांनी अटक केली. त्यात राजेंद्र देवकर, ज्ञानेश्वर लोभे,सदाशिव लोभे, रुपाली पाटील, नाना फुगे  आदींचा समावेश आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे 15 दिवसांपूर्वी आमच्या संघटनेची शेती मालाच्या हमीभावासाठी बैठक झाली होती. त्यात आमचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे आम्ही हे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला होता,  परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आम्ही मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन आंदोलन छेडले असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले.
या आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयासमोर तूर, हरभरा, मूग उधळून सरकारचा निषेध केला तर सदाभाऊ खोत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा दिल्या. सकाळपासून मंत्रालयाच्या छावा युवा संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे त्यांनी मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या संघटनेच्या 60 जणांना पूर्वीच ताब्यात घेतले असल्याची माहिती सतीश काळे यांनी सांगितले. मंत्रालयासमोर बॅग अथवा काही वस्तू हातात दिसलेल्या अनेकांना पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात येत होती. तर धान्य आढळलेल्या अनेकांची धरपकड करण्यात आली.
Copy