भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत 19 तक्रारींवर चर्चा

0

* भ्रष्टाचार निर्मुलनासंबंधित तक्रारींवर कार्यवाही करा
* जिल्हाधिकारी निंबाळकरांचे निर्देश
जळगाव – भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत प्राप्त झालेल्या तक्रारींवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले. जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, महानगरपालिकेचे उपायुक्त चंद्रकांत खोसे, चिटणीस मंदार कुलकर्णी, कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांचेसह तक्रारदार उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा अहवाल संबंधित विभागाने पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या बैठकीत एकूण 19 तक्रार अर्जांवर चर्चा करण्यात आली. यापैकी सात तक्रारी या जळगाव शहर महानगरपालिके संबंधित असल्याने त्यावर तातडीने कार्यवाही होणेसाठी आठ दिवसांच्या आत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत. तसेच फैजपूर नगरपालिकेसंदर्भात प्राप्त झालेल्या आठ तक्रारींची चौकशी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मुंडके यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात येत असून ते लवकरच या तक्रारींची चौकशी करतील असेही जिल्हाधिकारी यांनी तक्रारदारांना बैठकीत सांगितले. प्राप्त तक्रारींवर जे अधिकारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ करतील त्यांचेवरच कारवाई करण्यात येईल. असा इशाराही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिला.

Copy