भोसरीसाठी आमदार लांडगेंची वेगळी चूल!

0

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाने उशिरा का होईना पण पिंपरी-चिंचवड शहरासाठीचा आपला जाहीरनामा अखेर एकदाचा जाहीर करत यावरून उठवण्यात येत असलेल्या शंका-कुशंकांना पूर्णविराम दिला. परिवर्तनाचा नारा आणि ‘ना भय ना भ्रष्टाचार, पारदर्शक कारभार‘ हे ब्रीद घेऊन महापालिका निवडणुकीत उतरलेल्या भाजपच्या बहुप्रतीक्षित अशा या जाहीरनाम्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मात्र, एकीकडे संपूर्ण शहरासाठी (पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघातील महापालिकेत समाविष्ट प्रभाग) पक्षाचे टोकन म्हणून एकच जाहीरनामा घोषित होणे अभिप्रेत असताना भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरीसाठी वेगळा ‘निर्धारनामा’ जाहीर करत आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजीबाबतच्या चर्चांना एकच उधाण आलेले होते.

आ. महेश लांडगे यांची अनुपस्थिती खटकली

शुक्रवारी भाजपने आपल्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत शहरासाठीचा जाहीरनामा घोषित केला. जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, बाबू नायर, सचिन पटवर्धन, उमा खापरे, भारती चव्हाण, महेश कुलकर्णी, रवी लांडगे, प्रमोद निसाळ आदींची उपस्थिती होती. आमदार महेश लांडगे यांनी मात्र पक्षाच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने त्यांची अनुपस्थिती चांगलीच खटकली आहे. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल व वेगळ्या निर्धारनाम्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देतांना पालकमंत्री बापट यांना चांगलीच सारवासारव करावी लागली. व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाहीत असे सांगत मी तर म्हणतो केवळ भोसरी नव्हे तर पिंपरी व चिंचवड अशा प्रत्येक मतदारसंघासाठी वेगळा जाहीरनामा असायला हवा. पुणे येथे आम्ही 40 जाहीरनामे काढले असल्याची पुष्टीही पालकमंत्र्यांनी जोडली.

जाहीरनाम्यात शिळ्या कढीला ऊत

भाजपने प्रसिद्ध केलेल्या 27 कलमी जाहीरनाम्यात अनधिकृत बांधकामे अधिकृत करू या पारंपरिक आश्‍वासनांबरोबरच अनेक आश्‍वासने पिंपरी-चिंचवडकरांना दिली आहेत. सर्वांगीण विकास आणि स्मार्ट सिटी बनवणार असल्याचा निर्धारही यावेळी उपस्थितांतर्फे करण्यात आला. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांची अनुपस्थिती, त्यांनी भोसरी मतदारसंघासाठी तयार केलेला वेगळा निर्धारनामा यावरून मात्र चर्चांना पेव फुटले असून, भाजपात गटातटाचे राजकारण निवडणुकीपूर्वीच उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर पदाधिकार्‍यांनी पांघरून घालत वेळ मारून नेली. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक भाजपत गेले त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी संपुष्टात आली, तसेच राष्ट्रवादीत जसा अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानला जातो तसे नेतृत्व भाजपात नाही असे आरोप भाजपवर केले जात होते. त्याच बारभाई कारभाराचा प्रत्यय यानिमित्ताने आला असल्याचे शहरभर चर्चिले जात आहे.