भोसरीत 2 ऑक्टोबरला गदिमा कविता महोत्सव

0
भोसरी : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्यातर्फे गीतरामायणकार ग.दि. माडगुळकर जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी (2 ऑक्टोबर) सकाळी अकरा वाजता राज्यस्तरीय 25 वा गदिमा कविता महोत्सव भोसरीत आयोजित केला आहे, अशी माहिती संयोजक पुरुषोत्तम सदाफुले व मुरलीधर साठे यांनी दिली. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार्‍या महोत्सवाचे उदघाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस असतील.
यांचा होणार गौरव
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांना (जीवनगौरव), दिग्दर्शक नागराज मंजुळे (चित्रमहर्षी), ज्येष्ठ सूत्रसंवादक सुधीर गाडगीळ (शब्दयात्री), लोककलावंत रेखा मुसळे (गदिमा लोककला), भोसरीतील समता विद्यालय व दिघीतील रामचंद्र गायकवाड विद्यालय(संस्कारक्षम शाळा), श्रीकांत नेऊरगावकर व संदीप कुदळे (उद्योगभूषण) आणि नारायण पुरी (काव्यप्रतिभा) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. शून्य एक मी (पी. विठ्ठल, नांदेड), उन्हाचे घुमट खांद्यावर (डॉ. अनुजा जोशी, गोवा) या काव्यसंग्रहांना साहित्य आणि राज्यातील निमंत्रित आठ कवींना आम्ही गदिमांचे वारसदार पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी चैत्राली अभ्यंकर व सहकारी गीतरामायण सादर करतील.
Copy