भोळे महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन

0

भुसावळ । येथील भोळे महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. यामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधील 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या टाकाऊ पदार्थांपासून विविध वैज्ञानिक संकल्पना असणारे मॉडेल्स आणि पोष्टर तयार केले. टाकाऊ पदार्थांपासून प्रत्यक्ष कार्य करणारे आणि वैज्ञानिक तत्वाची उकल करण्यासाठी उत्कृष्ट मॉडेल्स हे यावर्षीच्या विज्ञान प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.

निर्माल्य संकलन प्रकल्प ठरला लक्षवेधी
या प्रकारात टाकाऊ सॉफ्ट ड्रिंकच्या अ‍ॅल्युमिनीअम कॅम्पपासून प्रत्यक्ष पॉपकॉर्नची निर्मिती, टाकाऊ पालापाचोळ्यापासून प्रदूषणविरहित शेगडी, थर्माकॉलपासून पाण्यात प्रत्यक्ष चालणारे जहाज हे प्रकल्प विशेष उल्लेखनिय ठरले. विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी तापी नदी परिसरात निर्माल्य संकलन करुन त्यापासून तीन टर्म कंपोस्ट खत निर्मितीचा पर्यावरणपूरक प्रकल्प साकारला. या विषयावर आधारीत पोष्टर हे लक्षवेधी ठरले.

प्रा. फालक यांनी केली पाहणी
याशिवाय पॉलिहाऊस प्रकल्पाची प्रतिकृती, करंट टेस्टिंग, स्मार्ट व्हिलेज, सिगारेटच्या धुरापासून शरिरावर होणार्‍या परिणामांचे विवेचन, मानवी हृदय आदी चार्टस् तयार करण्यात आले होते. ब्रेन गेट सिस्टिम आणि कमीतकमी पाण्यात वनस्पतींची वाढ करण्याचे तंत्र ही विशेष उल्लेखनिय ठरले. कार्यक्रमाचे आयोजन वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रा. माधुरी पाटील, प्रा. निर्मला वानखेडे यांनी केले. प्राचार्य डॉ. आर.पी. फालक यांनी प्रदर्शनाची पाहणी करुन विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.