भोलाणे येथे भाऊबीजेच्या दिवशी बहिण-भावाचे विषप्राशन ; बहिणीचा मृत्यू

0

जळगाव– तालुक्यातील भोलाणे येथे सख्या बहिण भावाने विषप्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना भाऊबीजेच्या दिवशी 16 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत बहिण अश्‍विता विजय कोळी वय 19 रा. भोलाणे हिचा उपचारार्थ रुग्णालयात हलवित असजतांना मृत्यू झाला आहे तर भाऊ विश्‍वजीत विजय कोळी वय 21 याच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत तालुका पोलिस स्टेशनला नोंद झाली आहे.

सोमवारी 16 नोव्हेंबर रोजी पाडव्याचा आणि भाऊबीजेचा दिवस होता. याच दिवशी विश्वजितला अभ्यासाचं नैराश्य आलं. अभ्यासात मन लागत नाही म्हणून तो निराश झाला होता. तसेच आई वडीलांसोबत त्याचा याच कारणावरुन वाद झाला. वाद झाल्यानंतर त्याने घरातील शेतात फवारणीसाठी वापरल्या जाणार्‍या औषध प्राशन केले. त्याच दरम्यान दहा मिनिटांच्या अंतरानंतर त्याची लहान बहीण अश्‍विता हिने देखील घराच्या बाहेर जाऊन विषप्राशन केले.

बहिणीच्या मृत्यूबाबत भावाला सांगितले नाही

कुटुंबियांच्या प्रकार लक्षात आल्यावर दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करत असतांना, वाटेतच अश्‍विता हिचा मृत्यू झाला. तर विश्‍वजीत याला शहरातील अपेक्स या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान त्याला अद्यापही बहिणीच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांकडून सांगण्यात आलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिसांनी रुग्णालयात जावून विश्‍वजीतचा जबाब नोंदविला. यात विश्‍वजीतने अभ्यासाच्या नैराश्यातून कृत्य करण्याचा प्रयत्न केला असे म्हटले आहे. मात्र त्याच्या बहिणीने का विषप्राशन केले याचे कारण कळू शकलेले नाही. मयत अश्‍विता हिच्यावर शवविच्छेदन करुन तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. भाऊबीजेच्या या घटनेमुळे भोलाणेसह जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अश्‍विता हिच्या मृत्यूप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अजय भोळे यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल साहेबराव पाटील करीत आहेत

Copy