भोरस फाट्याजवळील अपघातप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा

0

चाळीसगाव । चाळीसगाव-धुळे रोडवरील भोरस फाट्याजवळ 15 फेब्रूवारीला रात्री 11.30 वाजेच्या सुमारास भरधाव आयशर ने इंडीगो या गाडीला जोरदार धडक दिली होती. यात इंडीगो गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याप्रकरणी आज इंडीगो चालकाने दिलेल्या तक्रारीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर आयशर चालकाने देखील इंडीगो चालकासह एकाने पैश्याची मागणी करत मारहाण केल्याची फिर्यादी दाखल केली आहे. त्यानुसार दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत केली पैश्यांची मागणी

आयशर चालक सोहील हुसैन नजमेहुसेन (28) रा. शिवसद (उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली की, 15 रोजी रात्रीच्या सुमारास चाळीसगाव ते धुळे रोड वरील भोरस फाट्याजवळ त्यांचा आयशर ट्रक क्र. जी.जे. 06, ए.टी. 4166 ला इंडीका गाडीने धडक देवून गाडीचे बोनट, फॅन व रेडीएटरचे नुकसान झाले. सदर गाडी चालक व त्याचे सोबत असलेल्या इसमाने त्यांची गच्ची पकडून शिवीगाळ व मारहाण केली व त्यांची आयशर गाडी चाळीसगाव कन्नड रोड वरील राजस्थान ढाबा येथे आणून अडवून ठेवली व त्यांच्या मोबाईल नंबरवर आयशर मालकास वेळोवेळी फोन करून गाडीच्या नुकसानीच्या बदल्यात पैशांची मागणी केली.

अपघाताची नोंद

जितेंद्र बाबुराव पाटील (वय-44, रा. गणेशरोड) यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे कि, ते त्यांची टाटा इंडीगो मांझा क्र. एम.एच. 18, डब्ल्यू 9954 कारने 15 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास धुळेकडे जात असतांना भोरस फाट्याजवळ धुळे कडून चाळीसगाव कडे भरधाव वेगाने येणारी आयशर ट्रक क्र. जी.जे. 06, ए.टी. 4166 ने त्यांच्या कारला समोरून धडक दिल्याने कारचे नुकसान झाले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला 3/2017 प्रमाणे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबातची चौकशी सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहेत.