भोगवादी हव्यासापोटी मनःशांती हरवली – प्रा.पाटील

0
नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्यावतीने पार पडले एक दिवसीय संमेलन
आकुर्डी : विज्ञानयुगाने निर्माण केलेल्या भोगवादी सुधारणांच्या हव्यासापोटी माणसांची मन:शांती आणि सहनशीलता हरवून गेली आहे. साहित्य पंढरीत वावरणार्‍या साहित्यिकांनी आत्मकेंद्रित न बनता जीवन प्रवाही मार्गाने व शांततेने जगण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे साहित्य निर्माण करणे, ही काळाची गरज बनली आहे. साहित्य, चिंतनमुल्ये व चिरंतनमुल्ये जपणारे साहित्य यातला मुलभूत फरक ओळखून साहित्यिकांनी आपल्या कसदार साहित्याने ही कोंडी फोडली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.तुकाराम पाटील यांनी केले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित एक दिवसीय रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.पाटील बोलत होते. यावेळी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.भास्करराव आव्हाड, महानगरपालिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सचिव विठ्ठलराव काळभोर, नवयुगचे संस्थापक-अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष आर.एस.कुमार, सचिव माधुरी ओक यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेविका शर्मिला बाबर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अरुण बोर्‍हाडे, ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी चाळक, अपर्णा मोहिले, विनिता ऐनापुरे यांच्यासह अनेक साहित्यिकांनी संमेलनात उपस्थिती दर्शवली.
न्यूनगंड दूर करणे कर्तव्य
डॉ.रामचंद्र देखणे यांनी सांगितले की, समाजातील प्रज्ञावंतांचा न्यूनगंड दूर करणे हे साहित्यिकांचे आद्य कर्तव्य आहे. साहित्य हे भावदर्शी असावे. समाजाच्या संवेदना बोथट करणारे साहित्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लिहिले जाऊ नये. उपद्रवमूल्य निर्माण करणार्‍या शक्तींना प्रतिष्ठा प्राप्त होणे, हे मोठे सामाजिक शल्य आहे. आजकाल साहित्य संमेलने ही इव्हेंट व्हायला लागली असून त्यातला आत्मा हरवत चालला आहे. परंतु नवयुगचे हे संमेलन त्याला अपवाद आहे. कारण हे खर्‍या अर्थाने इथल्या मातीतले संमेलन आहे. यावेळी शहरातील प्रतिभावंत कवींच्या कविताफलकांनी सजलेल्या मोरया गोसावी साहित्य दालनाचे अनावरण आणि ग्रंथपूजन करून रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाचा प्रारंभ केला. नवयुगचे राज अहेरराव यांनी आपल्या प्रास्ताविकातून, प्रा.मोरे यांच्या प्रेरणेने साहित्यसेवा करण्याची संधी मिळाली. साहित्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या समविचारी मित्रांच्या सहकार्यातून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाची स्थापना केली. अनेक दिग्गजांनी साथ दिल्यामुळे नवयुगची आजपर्यंतची रौप्य महोत्सवी वाटचाल सुखरूप झाली. याप्रसंगी ‘नवोन्मेष’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले.
संतसाहित्यावर परिसंवाद
संमेलनाच्या दुसर्‍या सत्रात ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.भास्करराव आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘संतसाहित्य व लोककला : वास्तव आणि भवितव्य’ या परिसंवाद पार पडला. ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी सांगितले की, संतसाहित्य हे लोककलांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचले. पूर्वीचा तमाशा, हल्लीचे चित्रपट, दूरदर्शन मालिका यांच्या माध्यमातून रंजक स्वरूपात संतसाहित्य मांडले जाते. संत, पंत आणि तंत या साहित्यप्रवाहांतून लोकशिक्षण होते. सोपान खुडे यांनी, संत आणि लोककलावंत हे चिरकाल टिकणारे आहेत. लोककला नष्ट होत नाहीत; परंतु त्यांचे स्वरूप बदलले आहे. संतांनी जे प्रबोधन केले, तेच लोककलावंत कलेच्या माध्यमातून सांगतात; फक्त त्यांची भाषा रांगडी असते,अशी भूमिका मांडली. सुचेता गटणे यांनी, जिथे आधुनिक सुविधा पोहचल्या नाहीत, तिथेदेखील संतसाहित्य पोहचले आहे. जीवनात राहावे कसे हे संतांनी शिकवले आहे, असे मत व्यक्त केले. अ‍ॅड. आव्हाड यांनी, जे लिखाण संस्कार करते त्यालाच साहित्य म्हणावे. संतसाहित्यात संस्कार करण्याची क्षमता असून माणसाच्या आतला देव जागा कसा होईल ते संत सांगतात, असे विचार व्यक्त केले. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते राज अहेरराव यांच्या ‘शब्दवेड’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. उज्ज्वला केळकर यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले.
कविता सखये संग्रहाचे प्रकाशन
तिसर्‍या सत्रात ज्येष्ठ संगीत अभ्यासक सुरेश साखवळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि हाजी इक्बालखान यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अमराठी साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान’ या परिसंवाद झाला. ज्येष्ठ कथाकार बशीर मुजावर यांनी घरात दखनी उर्दू भाषा बोलत असलो तरी शालेय वयापासून मनावर मराठीचे संस्कार झाल्याचे आवर्जून सांगितले. दर्जेदार नियतकालिकांमध्ये कथा प्रसिद्ध झाल्यावर झालेल्या उत्कट आनंदी क्षणांचे त्यांनी कथन केले. परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप करताना सुरेश साखवळकर यांनी संस्कृत, हिंदी, इंग्रजी या प्रमुख भाषांसहित भारतीय भाषांचे मराठीवर झालेले संस्कार विविध उदाहरणांतून स्पष्ट केले. या सत्राच्या शेवटी माधुरी विधाटे यांच्या ‘कविता सखये’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. दिनेश भोसले यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले.
तेव्हा प्रतिमा उज्ज्वल होईल
साहित्य संमेलनाचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी तसेच मधू जोशी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. डॉ. कोत्तापल्ले यांनी सांगितले की, सांस्कृतिक क्षेत्रातील दूत जेव्हा देशाचे कारभारी होतील तेव्हाच देशाची प्रतिमा खर्‍या अर्थाने उज्ज्वल होईल. केवळ निवडून येणे हा एकमेव अजेंडा राजकीय व्यक्तींचा असतो. राजकारण नावाची गोष्ट ही सुसंस्कृत झाली पाहिजे; कारण समाजाला बदलण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनीच राजकारण करणे अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या संयोजनात झुंजार सावंत, सुरेश कंक, अश्‍विनी कुलकर्णी, पी.के.पाटील, पी.बी.शिंदे, मंगेश पोहणेकर, अनिकेत गुहे, समृद्धी सुर्वे, वर्षा बालगोपाल, नितीन हिरवे, नितीन यादव, कैलास भैरट, रमेश वाकनीस, अंतरा देशपांडे, प्रकाश घोरपडे, उमेश सणस, चिंतामणी कुलकर्णी, सविता इंगळे, प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले. संपत शिंदे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Copy