भोकर येथील बेपत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा गावाजवळच शेतात सापडला मृतदेह

0

जळगाव– तालुक्यातील भोकर गावातून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रोहित नवल सैंदाणे वय 11 या विद्यार्थ्यांचा गावापासून 500 मीटर अंतरावरील शेतात सोमवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. गळा दाबून मारल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. तीन ते चार दिवसांपासून मृतदेह पडला असल्याने त्याला दुर्गंधी सुटली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षकांनी घटनास्थळी भेट देवून माहिती जाणून घेतली. रविवारी या विद्यार्थ्याचे अपहरण करणार्‍या संशयिताचे रेखाचित्र जारी करण्यात आले होते. रेखाचित्रातील संशयिताने बालकाचा खून केल्याची शक्यता व्यक्त आहे. नेमका मृत्यू कसा झाला यासह इतर गोष्टींचा शवविच्छेदनानंतर अहवालातून उलगडा होणार आहे.

पाणी भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍याला दिसला मृतदेह

भोकर गावापासून 500 मीटरच्या अंतरावर राजेंद्र शिवलाल सोनवणे रा. जळगाव यांचे मालकीचे शेत आहे. भगवान वामन सोनवणे यांनी हे शेत करायला घेतले असून शेतात मका लावला आहे. मक्याला पाण्यासाठी देण्यासाठी भगवान सोनवणे सोमवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास शेतात आले. यावेळी शेतातून जाणार्‍या पायवाटेवर बालकाचा अर्थनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ याबाबत स्थानिक  गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील यांना माहिती. जितेंद्र पाटील यांनी वरिष्ठांना प्रकार कळविला.

अपर पोलीस अधीक्षकांसह अधिकार्‍यांकडून पाहणी

बालकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपपोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाची ओळख पटविली असता तो, 12 तारखेपासून भोकर गावातून बेपत्ता असलेल्या रोहित नवल सैंदाणे या विद्यार्थ्यांचा असल्याचे समोर आले. तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक निशिकांत जोशी यांच्यासह कर्मचारी विश्‍वास मराठे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.