भैयालाल भोतमांगे यांचे हृदयविकाराने निधन

0

भंडारा । संपूर्ण देशाला हादरवणार्‍या भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. दशकभरानंतरही भोतमांगे न्यायाच्याच प्रतीक्षेत होते. खैरलांजीत 29 सप्टेंबर 2006 रोजी माणुसकीला काळीमा फासणारे हत्याकांड घडले होते. घटनेच्या दिवशी गावातील दलितेतर समुहाने भोतमांगे यांच्या झोपडीला वेढा घातला आणि शिविगाळ केली. तसेच झोपडीत असलेल्यांवर हल्ला केला होता. जमावाने भैयालालची पत्नी सुरेखा, मुले प्रियंका, सुधीर आणि रोशन यांची अमानुषपणे हत्या केली होती. भैयालाल शेतावर गेल्याने या हल्ल्यातून बचावले होते. ही घटना समोर येताच देशभर गहजब उडाला होता. भैयालाल यांना म्हाडा कॉलनीत घर दिले तसेच वसतिगृहात सुरक्षा रक्षकाची नोकरी देण्यात आली होती.