भूपती विरुद्ध पेस आंतरिक वाद विकोपाला

0

बंगळुरु । भारतीय टेनिसमधील महेश भूपती विरुद्ध लिएण्डर पेस वाद विकोपाला पोहोचला आहे. डेव्हिस चषक संघनिवडीच्या निमित्ताने नवे वळण मिळाले. उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या लढतीसाठी अनुभवी लिएण्डर पेसला संघातून डच्चू देण्याचा निर्णय कर्णधार महेश भूपतीने जाहीर केल्याने हा वाद अधिक वाढला आहे. एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेल्या या जोडीने ग्रँड स्लॅम जेतेपदांसह असंख्य प्रतिष्ठेच्या स्पर्धाची जेतेपदे नावावर केली. मात्र जोडी म्हणून खेळणे सोडल्यानंतर या दोघांमधील वैयक्तिक वादाने भारतीय टेनिसचे अपरिमित नुकसान झाले आहे. आनंद अमृतराज यांच्याऐवजी महेश भूपतीची न खेळणार कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर वाद नव्याने सुरू होणार हे स्पष्ट झाले होते. त्याची प्रचीती काल आली. महेश भूपतीने डेव्हिस चषक निवडीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केले आहे, अशा शब्दांत अनुभवी टेनिसपटू पेसने आपली नाराजी व्यक्त केली.

भूपतीच्या निर्णयामुळे पदार्पण केल्यापासून 27 वर्षांनंतर डेव्हिस चषकासाठीच्या संघातून पेसला पहिल्यांदाच वगळण्यात येणार आहे. उझबेकिस्तानविरुद्धची आशिया/ ओशनिया गटाचा सामना शुक्रवारपासून बेंगळुरूत सुरू होत आहे. या लढतीसाठी निवडलेल्या मूळ भारतीय संघात लिएण्डर पेसची निवड करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी एकेरी विशेषज्ञ युकी भांब्रीने दुखापतीमुळे या लढतीतून माघार घेतली. युकीच्या अनुपस्थितीमुळे पेस आणि रोहन बोपण्णा यांच्यापैकी एकाला संधी मिळणार हे स्पष्ट झाले. मेक्सिको येथील लिऑन स्पर्धा जिंकून पेस प्रदीर्घ प्रवासानंतर बेंगळुरूत दाखल झाला. सामन्यासाठी 24 तास बाकी असताना भूपतीने पेसला वगळण्याचा निर्णय जाहीर केला. पेसऐवजी भूपतीने बोपण्णाला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. बोपण्णा एन. श्रीराम बालाजीच्या साथीने दुहेरीच्या लढतीत खेळेल. या जोडीचा मुकाबला फरूख दस्तॉव्ह आणि संजर फायझिव्ह जोडीशी होणार आहे. बोपण्णा जागतिक क्रमवारीत 24व्या स्थानी आहे. पेस 53व्या स्थानी आहे. दरम्यान एकेरी प्रकारात रामकुमार रामनाथनवर भारताची भिस्त असेल. रामकुमारची लढत तेमुर इसमेलोव्हशी होणार आहे. युकीच्या अनुपस्थितीत प्रज्नेश गुणेश्वरनला डेव्हिस चषक पदार्पणाची संधी मिळणार आहे. प्रज्नेश आणि फायझिव्ह समोरासमोर असणार आहेत. दरम्यान, बोपण्णाच्या निवडीचे समर्थन करताना भूपती म्हणाला, “बेंगळुरूमधील कोर्ट वेगवान आहे. बोपण्णाची सव्र्हिस वेगवान आहे. वर्षांची सुरुवातही त्याच्यासाठी चांगली झाली आहे.