भूताची भीती दाखवत बालिकेवर लैंगिक अत्याचार

0
चिंचवडच्या तडीपार सराईत गुन्हेगाराकडून घृणास्पद कृत्य
मारहाण, अत्याचारामुळे रुग्णालयात उपचार सुरू
पिंपरी-चिंचवड : चार वर्षाच्या बालिकेवर शेजारी राहणार्‍या इसमाने तिचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केला. दरम्यान तिला मारहाण देखील करण्यात आली असल्याने पीडित बालिका जखमी झाली आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 2) सायंकाळी चिंचवड येथे घडला. याप्रकरणी आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या वडिलांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोहसीन मोहमंद शेख (रा.प्रेस्टीज क्लासीक प्लॅट नं.214 डी बिल्डींग, दवाबाजार, चिंचवड)याच्यावर गुन्हा करत अटक केली आहे. तो तडीपार सराईत गुन्हेगार आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृत्य करून आरोपीचे पलायन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पीडित बालिका घरासमोर खेळत होती. आरोपीने तिला भुताची भीती दाखवून तिचे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अपहरण केले. घरापासून दूर अंतरावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला मारहाण देखील केली. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली. या प्रकारानंतर आरोपीने मुलीला तिथेच सोडून दिले आणि स्वतः पळून गेला. रात्री नऊच्या सुमारास पीडित मुलगी घरी आली. घरच्यांनी तिला इतका वेळ कुठे होतीस, असे विचारले असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित बालिकेवर उपचार सुरू आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
तडीपारीचा चारवेळा भंग
अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मालमत्तेविषयक गुन्हे दाखल आहेत. त्यावरून चिंचवड पोलिसांनी त्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो चिंचवड हद्दीत चार वेळा आढळून आला. प्रत्येक वेळी त्याच्यावर पोलिसांकडून 142 अन्वये कारवाई करण्यात आली. आरोपीचा तडीपारीचा कालावधी डिसेंबर 2019 मध्ये संपणार होता. परंतु त्यापूर्वीच आरोपी हद्दीमध्ये आढळला. तसेच त्याने निर्घृण कृत्य केले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Copy