भुसावळ, सावदा नगरपालिकांसह मुक्ताईनगर, बोदवड नगर पंचायतींच्या कामांना मंजूरी

1

आ.एकनाथराव खडसे व आ.संजय सावकारे यांची मनिषा म्हैसकरांसोबत विधान भवनात बैठक
जळगाव – भुसावळ, सावदा नगरपालिकांसह बोदवड, मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आज आ.एकनाथराव खडसे, आ.संजय सावकारे यांची नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या समवेत बैठक विधान भवनात पार पडली. सदरच्या बैठकीस नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे सचिव एम.शंकरनारायणन, सह सचिव पा.बा.जाधव सर्व नगर परिषदांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नगर परिषद निहाय प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.

पाणी पुरवठा, हद्दी वाढ,भुयारी गटारींचे प्रश्‍न मार्गी
बोदवड नगर पंचायतीकरीता नवीन पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन सादर करण्याचे प्रधान सचिव यांनी निर्देश दिले. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसात प्रस्तावास मंजूरी देण्याचे आश्वासन प्रधान सचिवांनी दिले. सावदा नगर परिषदेची हद्दवाढ, एकवटलेली लोकसंख्या विचारात घेवुन हद्दवाढीबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच भूसावळ नगर परिषदेच्या हद्दवाढ प्रस्तावातील त्रुटीचे पूर्तता करुन फेर प्रस्ताव सादर करण्याचे आदेशीत केले. सावदा नगर परिषदेचा हद्दबाहेरील कब्रस्थान विकसित करण्याकरीता वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत किंवा नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केल्यानंतर मंजूरी देण्यात येईल असे आश्वासन दिले. सावदा नगर परिषद तसेच मुक्ताईनगर नगर पंचायतीचा पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याबाबत मान्यता दिली. तसेच मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भुयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणेबाबतच्या प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिली.

मुक्ताईनगर नगर पंचायत
मुक्ताईनगर नगर पंचायत प्रशासकीय इमारत उभारणी कामी 100 टक्के अनुदान तसेच विशेष रस्ता अनुदान देण्याची मान्यता देण्यात आली. अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत विशेष निधी देण्यास मंजूरी देण्यात आली तसेच अग्निशमन यंत्रणा उभारणीकरीता निधी उपलब्ध करुन देण्याचे निदेश देण्यात आले. मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या 81 कर्मचार्‍यांच्या समावेशनाबाबत विशेष बाब म्हणून सर्व कर्मचार्‍यांचे समावेशन होईल, असा आकृतीबंध तयार करण्याचे संचालनालयास निर्देश दिलेत त्याकरीता मुख्याधिकारी यांनी त्याबाबतचा प्रस्ताव सत्वर सादर करण्याबाबत निदेश दिलेत.

भुसावळ नगरपालिका
भुसावळ नगर परिषदेच्या हद्दतील रेल्वे विभागाने साधारण 2500 घरांचे अतिक्रमण काढल्यामुळे 2500 कुटुंब उघड्यावर आले आहेत. त्यांचा निवार्‍याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याकरीता शासकीय जागेची निवड करुन जिल्हाधिकारी यांच्याकडून जागा हस्तांतरीत करुन घ्यावी व त्यावर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सर्वांना लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. भुसावळ शहराच्या अमृत पाणी पुरवठा योजने अंतर्गत प्रस्तावीत बंधार्‍याचे जलसंपदा विभागाकडून किंवा हतनूर धरणातुन, दिपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या बंधार्‍यातून नदीपात्राच्या उजव्या बाजुने तसेच रेल्वेच्या बंधार्‍याची उंची वाढविणे याबाबत जलसंपदा विभाग व रेल्वे विभागाशी विचार विनिमय करुन दोन दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.

चारही ठिकाणची रिक्त पदे भरणार
भुसावळ, सावदा, बोदवड, मुक्ताईनगर या चारही नगर परिषद / नगर पंचायतींमध्ये राज्यस्तरीय संवर्गातील पदे तात्काळ भरण्याबाबत आयुक्तंना निर्देश दिले. यावर सर्व पदे लवकरात लवकर भरण्याचे आश्‍वासन देण्यात आले. ईईएसएल कंपनीमार्फत एल.ई.डी. लाईट लावण्याच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. दिनांक 31 डिसेंबर पर्यंत चारही नगर परिषदे अंतर्गत एल.ई.डी. लाईट 100 टक्के लावण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे कंपनी अधिकार्‍यांनी आश्वासन दिले. पंडित दिनदयाल राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान सर्व नगर पंचायतींना लागु करण्याबाबत नगर परिषद प्रशासन संचालनालयास निदेश दिलेत. प्रधान मंत्री आवास योजनेसाठी सर्व नगर पंचायतींची यादी शासनस्तरावरील गृहनिर्माण विभागास सादर करुन सर्व नगर पंचायती लागु करण्याचे निर्देश दिलेत.

Copy