भुसावळ शहर मोर्चाने दणाणले

0

शहरात बहुजन क्रांती मोर्चातर्फे विराट रॅली : सीएएसह एनआरसीला कडाडून विरोध

भुसावळ : बहुजन क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात सीएए व एनआरसी कायद्याला तीव्र विरोध दर्शवत बुधवारी सकाळी 11 वाजता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान कायद्याला विरोध दर्शवत मोर्चेकर्‍यांनी ‘हमे चाहिए आझादी’ ची घोषणाबाजी केली. अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या या मोर्चात हजारो मुस्लीम बांधंवासह विविध धर्मीय समाजबांधव सहभागी झाले. बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर मोर्चा आल्यानंतर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोर्चा आल्यानंतर वाहतूक थांबवण्यात आल्याने वाहनधारकांचे काहीसे हाल झाले. मोर्चात तिरंगा ध्वजासह केशरी, नीळा, हिरवा ध्वज फडकावण्यात आला तसेच या मोर्चात अनेकांनी डोक्याला काळी पट्टी बांधून तसेच काळा ड्रेस परीधान करून या कायद्याचा निषेध नोंदवला.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोर्चा दरम्यान शहर व बाजारपेठ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या नेतृत्वात नियोजन केले. शहर, बाजारपेठ पोलिसांसह बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तसेच आरसीपी प्लॉटून व कर्मचार्‍यांनी बंदोबस्त राखला तर शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर यांनी वाहतुकीचे नियोजन केले.

देश विभाजनाचा कुटील डाव -विलास खरात
बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक विलास खरात म्हणाले की, एनआरसी व सीएए कायद्यामुळे देशाचे विभाजन होणार आहे. केंद्र सरकार देशाचे तुकडे करण्याच्या मार्गावर असून आधी यांचे डीएनए करावे, अशी आपली प्रमुख मागणी आहे. या षडयंत्रामागे आरएसएस व मोहन भागवत यांचा हात असून भारताचे जेव्हा विभाजन झाले तेव्हा पाच लाख लोकांचा मृत्यू झाला हे विसरू नये. राज्यसभेत भाजपाचे बहुमत नसतानाही काँग्रेसने मदत केल्याने राज्यसभेत हे बहुमत पास झाले, काँग्रेस-भाजपाच्या काळात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर विलास खरात, मौलाना नूर मोहम्मद, माजी नगरसेवक जगन सोनवणे, एमआयएमचे फिरोज शेख, एम.बी.तडवी, पंकज तायडे, भीमराज कोळी, दिलीप कांबळे, गणेश सपकाळे, प्रतिभा उबाळे, कुंदन तायडे, हाफिज अमजद, सुरेश ठाकूर, इरफान शेठ, जावेद जनाब यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

भाजपा सरकार जातीवादी -मान्यवरांचा सूर
प्रसंगी तन्वीर खान म्हणाले की, जे स्वतः 15 टक्के विदेशी आहेत ते आमच्याकडून पुरावा मागत आहे. अंध भक्त या कायद्याची बाजू घेत असलेतरी उद्या ते सरकारला कोसणार आहेत. राज्य उपाध्यक्ष हाफिज फिरोज म्हणाले की, देश स्वतंत्र असल्याने येथे प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे. ज्या कायद्यांनी देशाला फायदे नाहीत, ते कायदे केले जात आहेत. प्रतिभा उबाळे म्हणाल्या की, 25 लाख लोकांनी प्राणाची आहुती दिल्यानंतर देश स्वतंत्र झाला. हे लोक युरेशियातून आल्याने यांचे डीएनए तपासण्याची गरज आहे. मौलाना नूर आलम सैय्यद म्हणाले की, जे जवान काल देशाची सुरक्षा करीत होते ते जवान आज आम्हाला मारहाण करीत आहेत. मौलाना नूर मोहम्मद व माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बामसेफ नेते हमीद शेख यांनी केले.

Copy