भुसावळ रेल्वे स्थानकावर बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याच्या अफवेने यंत्रणेला फुटला घाम

भुसावळ : लाखो प्रवाशांची जा-ये करणार्‍या भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूला बेवारसरीत्या पडून असलेल्या बॅगेत बॉम्ब असल्याच्या शक्यतेने गुरुवारी सायंकाळी सुरक्षा यंत्रणांना चांगलाच घाम फुटला. यंत्रणांची सुरक्षा तत्परता जाणून घेण्यासाठी एरव्ही रेल्वे स्थानकावर होत असलेले मॉकड्रील नवीन नाही मात्र गुरुवारच्या घटनेत खरीखुरी बॅग बेवारसरीत्या पडून असल्याने यंत्रणा पुरती हादरली. स्थानिक स्तरावर बॉम्ब शोधक पथक नसल्याने जळगावच्या पथकाला माहिती देण्यात आली. एव्हाना रेल्वेच्या उत्तर बाजूचा परीसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला व वाहतूक थांबवण्यात आली तर सायंकाळी सात वाजता बीडीडीएसच्या पथकाने संशयास्पद बॅगेची टायसन व वीरू या श्वानांद्वारे तसेच विशेष यंत्राद्वारे तपासणी केली व तासाभरानंतर बॅगेत काहीच नसल्याचा ग्रीन सिग्नल दिल्यानंतर यंत्रणेसह भुसावळकर रेल्वे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, रेल्वेच्या उत्तर बाजूला प्रवासी बाहेर पडण्याच्या द्वाराजवळ बेवारसरीत्या बॅग ठेवून यंत्रणेला घाम फोडणार्‍या रजत नामक युपीच्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे. बॅगेत औषधे सांडल्याने बॅग बेवारसरीत्या ठेवल्याची कबुली या प्रवाशाने दिली असून रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.

बेवारस बॅगेने फोडला यंत्रणांना घाम
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूला असलेल्या आऊटर गेटजवळ (बाहेर पडण्याचा मार्ग) गुरुवारी दुपारी चार वाजता बेवारस बॅग पडून असल्याची माहिती रीक्षा युनियनचे पदाधिकारी भीमराव तायडे यांना यंत्रणेला दिली तर लोहमार्गचे कर्मचारी निकम यांनी पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांना बेवारस बॅगेची कल्पना देताच रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात चार ते पाच प्रवाशांसोबत असलेल्यांपैकी एक प्रवासी काळ्या रंगाची बॅग बेवारसरीत्या सोडून देत असल्याचे दिसल्याने यंत्रणेचा संशय बळावला. स्थानिक पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राधाकृष्ण मीना तसेच एसआयबी निरीक्षक आसीफ शेख यांनाही माहिती कळवताच अवघ्या काही मिनिटात यंत्रणा दाखल झाली.

रस्ता केला निर्मनुष्य : तिकीट खिडक्या बंद
बेवारस बॅगेत बॉम्बच असावा या शक्यतेने यंत्रणा हादरली असतानाच रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेली वाहतूक तातडीने थांबवण्यात आली, तिकीट बुकींग बंद करून प्रवाशांना अन्य पर्यायी मागाने पुढील बाजूच्या प्रवेशद्वाराने रेल्वे स्थानकात जाण्याचे सूचित करण्यात आले तर पत्रकार, पोलिस यांनाही रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस जावू देण्यास मनाई करण्यात आली.

बीडीडीएस यंत्रणेच्या सिग्नलने मिळाला दिलासा
गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास जळगाव येथील बीडीडीएस पथकाचे उपनिरीक्षक अमोल कवडे हे 12 सहकार्‍यांसह वाहनातून दाखल झाले. सुरूवातीला टायसन व वीरू या श्वानांद्वारे बॅगची तपासणी करण्यात आली मात्र काही सिग्नल न मिळाल्याने विशेष यंत्राद्वारे बॅग तपासण्यात आली मात्र स्फोटक काहीच नसल्याचा सिग्नल मिळताच बॅग ताब्यात घेवून रेल्वे स्थानकाच्या मोकळ्या जागेवर नेवून तिची बारकाईने तपासणी करण्यात आली असता त्यात काहीही आढळले नाही. रात्री आठ वाजेच्या सुमारास बीडीडीएस यंत्रणेने पोलिस उपअधीक्षकांना बॅगेत काहीही आक्षेपार्ह नसल्याचा सिग्नल दिल्यानंतर यंत्रणेसह प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

12 संशयीत प्रवासी ताब्यात
सुरक्षा यंत्रणांना पुरता हादरवणार्‍या व रेल्वे स्थानकाबाहेर बेवारसरीत्या बॅग ठेवणार्‍या प्रवाशांचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेतल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास दक्षिण भागातील मुसाफिर खान्याजवळून 12 प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील रजत (उनाव, लालगंज, उत्तप्रदेश) या प्रवाशाने बेवारसरीत्या बॅग ठेवल्याचे स्पष्ट झाल्याने त्यास लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. बॅगेत औषधाची बाटली सांडल्याने त्यातील सामान काढून बॅग रेल्वे स्थानकाबाहेर ठेवल्याची कबुली या प्रवाशाने दिली आहे. रजतसोबतचे 12 मित्र सेंट्रीग काम करण्यासाठी बंग्लोर येथे निघाल्याची माहिती निरीक्षक विजय घेर्डे यांनी दिली.