भुसावळ येथील आरपीएफ कर्मचार्‍यांच्या संकल्पचित्रास पोस्ट टिकीटासाठी मान्यता

0

भुसावळ- रेल्वेप्रशासनातर्फे बिहारमधील धनबाद येथे ऑगस्टमध्ये अ‍ॅथलेटीक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेसाठी सर्वसमावेशक अशा स्वरुपाचे संकल्पचित्र मागविण्यात आले होते. यात भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा दलातील एका कर्मचार्याने आपल्या कामाव्यतिरीक्त कलाकृती जोपासून संकल्पचित्र बनवून ते धनबाद येथे पाठविले असता या स्पर्धेची आठवण म्हणून ते चित्र पोस्ट तिकीटावर प्रकाशित करण्यात आले असून या कलाकृतीतून या कर्मचार्याने आपल्या कल्पकतेची चुणूक दाखवून दिली.

मानचित्रात बसवून त्यांची अतिशय सुबकरित्या केली मांडणी
येथील रेल्वे सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल असलेले शंकर एडले या कर्मचार्‍याने आपली कलाकृती जोपसत त्याचा वारंवार प्रत्यय आणून दिला. बिहार राज्यातील धनबाद येथे रेल्वे कर्मचार्यांसाठी अ‍ॅथलेटीक चॅम्पियनशीप स्पर्धा ऑगस्टमध्ये घेण्यात आल्या होत्या. यास्पर्धेच्या मानचित्र पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. यात खेळांमध्ये महिलांचा सहभाग, बुलेट रेल्वे, देशाचा होणारा विकास, हरित भारत तसेच रेल्वेच्या 17 विभागांचे देशाच्या विकासात असलेले योगदान या विषयांना एकत्रित करुन मानचित्र बनवायचे होते. यात एडले यांनी या सर्व संकल्पांना आपल्या या मानचित्रात बसवून त्यांची अतिशय सुबकरित्या मांडणी केली व हे चित्र रेल्वे बोर्डाकडे पाठविले असता या चित्राची निवड करण्यात आली. त्यामुळे या स्पर्धेच्या आठवणी म्हणून याचे रेल्वेतर्फे पोस्ट तिकीट अनावरण करण्यात आले. एडले यांच्या या कामगिरीमुळे भुसावळ विभागाची मान उंचावली आहे. या अगोदरही एडले यांनी 2015 मध्ये झालेल्या नाशिक येथील कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी बेसिक आराखडा तयार केला होता याबद्दल त्यांना पदक देवून सन्मानित करण्यात आले होते. तसेच 182 या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांबद्दल जनजागृती म्हणून चलचित्र बनवून सादर केले होते. याबद्दलही त्यांचे कौतुक करण्यात आले होते.

एडले यांचे कौतूक
एडले हे अमरावती येथील मुळ रहिवासी असून त्यांनी यवतमाळ येथे इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग डिप्लोमाचे शिक्षण पुर्ण केले आहे. त्यानंतर ते रेल्वे सुरक्षा दलात रुजू झाले. ते गेल्या 15 वर्षापासून सुरक्षा दलात कार्यरत असून भुसावळ येथे 7 वर्षांपासून कार्यरत आहे. तसेच राष्ट्रीय व सामाजिक कार्याची त्यांना आवड असून ते दरवर्षी कंडारी येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करतात यातूनच त्यांची सामाजिक कार्याविषयी असलेली ओढ दिसून येते. तसेच प्रत्येक कर्मचार्‍यांमध्ये काहीतरी कलागुण उपजत असतात मात्र त्यांची ओळख करुन घेत त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे एडले यांनी सांगितले.