भुसावळ पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार : जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील 

Whoever is interested in the Bhusawal municipality, the ticket allocation committee will do it ! भुसावळ :  आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत इच्छूक कुणीही असलातरी त्यांना तिकीट देण्याबाबत अंतिम निर्णय पक्षाची छाननी समितीच घेईल, असे परखड मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील यांनी येथे व्यक्त केले. शनी मंदिर वॉर्डातील माजी आमदारांच्या कार्यालयात मंगळवारच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, या बैठकीला माजी मंत्री एकनाथराव खडसे गटातील समर्थकांसह माजी नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीतील दुफळी पुन्हा समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

छाननी समिती घेणार तिकीटाबाबत अंतिम निर्णय
अ‍ॅड.रवींद्र पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी कामाला लागावे शिवाय प्रत्येक गावात जावून इच्छूकांच्या भेटी-गाठी घ्याव्यात शिवाय आगामी विधानसभेवर आपले लक्ष असून राष्ट्रवादीचे त्यासाठी संघटन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शहरात शहराध्यक्षांकडे इच्छुकांना फार्म मिळणार असून तालुका स्तरावर तो तालुकाध्यक्षांकडे मिळेल फार्ममधील माहितीची छाननी करून अंतिम तिकीट कुणाला द्यायचे याबाबतचा अधिकार पक्षातील वरीष्ठांच्या सल्ल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार चौधरी आदींची छाननी समिती घेईल, असेही ते म्हणाले.

पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार
माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, आगामी पालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना, छोटे पक्ष सोबत घेवून लढण्याचा प्रयत्न असणार असणार असून छोट्या पक्षांनाही न्याय देण्याचा प्रयत्न असणार आहे. भुसावळ पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इच्छूकांच्या 9 रोजी मुलाखती घेण्यात येणार असून पक्ष ज्यांना उमेदवारी देईल तो निर्णय अंतीम राहणार असून पक्षाचे प्रत्येकाला काम करायचे आहे, असेही ते म्हणाले. पंचायत समितीतही राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी करीत आगामी पालिकेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे तिकीट कुणालाही द्या, आपले त्याबाबत म्हणणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यांची बैठकीला उपस्थिती
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, उल्हास पगार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, आशिक खान शेर खान, सचिन अण्णा पाटील, दुर्गेश ठाकूर, सतीश घुले, जीवन अहिरे, डी.पी.साळुंखे, उपसभापती अशोक पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, अशोक चौधरी, माजी नगरसेवक युवराज पाटील, रमेश पाटील, सुधाकर जावळे, नंदा निकम, राहुल बोरसे, श्रीकृष्ण चौधरी , नाना पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक एस.आर.पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमचे नेते एकनाथराव खडसेच : प्रा.सुनील नेवे
आमचे नेते एकनाथराव खडसेच असून ते मुंबईत आहेत. त्यांच्या व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत आम्ही सर्व सहभागी निश्चित होवू शिवाय पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा भडकेल, असा विश्वास खडसेंचे कट्टर समर्थक व माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे म्हणाले.