Private Advt

भुसावळ पालिका मुख्याधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनाही कोरोना

कोरोनाच्या बाबतीत भुसावळ शहर ठरतेय हॉटस्पॉट : अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 866 वर

भुसावळ : शहरात गत आठवडाभरापासून झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचार्‍यांनाही कोरोना झाल्याने पालिकेचे कामकाज प्रभावीत झाले आहेत. भुसावळ पालिका कार्यालयातील मुख्याधिकार्‍यांसह आठ अधिकारी व कर्मचारी पॉझीटीव्ह आल्यानंतर पालिकेचे कामकाज प्रभावीत झाले आहे तर अन्य कर्मचार्‍यांमध्ये भीती पसरली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असली तरी पालिकेतील प्रमुख मनुष्यबळ कमी झाल्याने कामांवर परीणाम होणार आहे.

अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना कोरोना
मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे शनिवारी झालेल्या तपसणीत बाधीत आढळून आले होते तर दोन दिवस आधी कर अधीक्षक, लेखाधिकारी, लेखापाल, आस्थापना प्रमुखदेखील बाधीत झाले तसेच तीन ऑपरेटर कर्मचार्‍यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पालिकेतील आठ प्रमुख अधिकारी व कर्मचारी बाधीत आढळल्याने इतर कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना सौम्य व मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. सर्वांनी दोन डोस घेतले होते, यानंतर कोरोनाची लागण झाल्याने सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पालिकेतील महत्वाच्या पदांवरील मनुष्यबळ कमी झाल्याने कामे रेंगाळण्याची भीती आहे. कर्मचारी बाधीत झाल्याने कामे रेंगाणार असलीतरी आठवड्याभरानंतर सर्व कर्मचारी व अधिकारी रुजू झाल्यानंतर कामाला गती दिली जाणार आहे.

अ‍ॅक्टीव्ह रुग्ण संख्या 866 वर
भुसावळ शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून रेल्वे प्रवास केलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने कोरोना चाचण्या अधिकाधिक संख्येने वाढवण्याची अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात रविवारी 354 रुग्ण आढळले असलेतरी त्यातील तब्बल 132 रुग्ण भुसावळ शहर व तालुक्यातील आहेत. शहरासह तालुक्यात यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 866 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधीतांना सौम्य व मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला अशी लक्षणे बाधीतांमध्ये आढळून येत आहेत. रविवारी झालेल्या चाचणीत शहरात 132 रुग्ण आढळून आले तर उपचार घेणार्‍या 22 रुग्णांना डिस्जार्ज मिळाला.

या भागात आढळले बाधीत रुग्ण
रविवारी शहरातील गरुड प्लॉट, गोलाणी कॉम्प्लेक्स, फिल्टर हाऊस, शिवदत्त नगर, महेश नगर, देनानगर, फालक नगर, सिंधी कॉलनी, आनंदराव कॉलनी, मोहम्मदीनगर, गडकरी नगर, पाटील मळा, जाम मोहल्ला, मेथाजी मळा, कावडे नगर, स्वामी विहार, रेल्वे ऑफिसर कॉलनी, शांतीनगर, खळवाडी, महात्मा फुलेनगर, गायत्रीनगर आदी परीसरात रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील रेल्वे हॉस्पीटलमध्ये 15 तर ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये एक अशा 16 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.