भुसावळ पालिका मुख्याधिकाऱ्यांना शिविगाळ : माजी आमदार संताेष चौधरीं विरुद्ध गुन्हा

भुसावळ : अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार सताेष चाैधरी यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

अतिक्रमण झाल्याची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
शहरातील टिंबर मार्केटमधील सर्व्हे  २०६ वरील अवैध बांधकामाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती व या संदर्भात शहानिशा करण्याबाबत भुसावळ मुख्याधिकार्‍यांना सोमवारी पत्र देण्यात आल्यानंतर मुख्याधिकारी चिद्रवार व पालिकेचे कर्मचारी टिंबर मार्केटमधील सर्व्हे  २०६ वरील सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर गेल्यानंतर तिथे माजी आमदार संताेष चाैधरी यांनी येत मुख्याधिकारी यांच्याशी वाद घातला. त्यांना अर्वाेच्च भाषेत शिवीगाळ केली, शासकीय कामात अडथळा आणला, असा आरोप आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संताेष चाैधरी यांच्याविरूध्द सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पाेलिस निरीक्षक मंगेश गाेटला करीत आहे.

Copy