भुसावळ तालुक्यात आजपासून गोवर-रूबेला लसीकरण मोहिम

0

प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर ; 89 हजार 319 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट

भुसावळ- भुसावळ तालुक्यात मंगळवार, 27 नोव्हेंबरपासून गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत असून शहर व तालुक्यातील 89 हजार 319 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी पत्रकार परीषदेत दिली. सोमवारी दुपारी चार वाजता प्रांत कार्यालयात परीषद झाली. याप्रसंगी प्रांत चिंचकर म्हणाले की, 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना ही लस देण्यात येणार असून 199 आरोग्य सेविका व 46 पर्यवेक्षकांसह 30 अधिकार्‍यांच्या पथकातर्फे महिनाभर मोहिम राबवण्यात येणार आहे.

बालमृत्यू व अर्भक मृत्यू टाळण्यासाठी मोहिम
प्रांताधिकारी म्हणून बालमृत्यू व अर्भक मृत्यू टाळण्यासाठी मोहिम राबवली जाणार असून ग्रामीण भागातील 40 हजार 252 बालकांना तर शहरी भागातील 49 हजार 67 अशा एकूण 89 हजार 319 बालकांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी शाळा-हायस्कूलसह अंगणवाड्यांमध्ये फिरते पथक जाणार असून 27 नोव्हेंबरपासून पुढील दोन आठवडे शाळा व नंतर पुढील दोन आठवडे बाह्यसंपर्क सत्र माध्यमातून लसीकरण होईल व नंतर राहिलेल्या बालकांसाठी घरोघरी जावून मोहिम राबवली जाईल.

मोहिमेसाठी समितीची स्थापना
लसीकरण मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यात तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, नगरपालिका मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता दवंगे (पांढरे), बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व शहरी), विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, पत्रकार परीषदेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता दवंगे (पांढरे), गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, आरोग्य पर्यवेक्षका जे.ए.जगताप आदींची उपस्थिती होती.

Copy