Private Advt

भुसावळ तालुक्यातील 29 उपद्रवींना 16 एप्रिलपर्यंत शहरबंदी

प्रांताधिकार्‍यांचे आदेश : उत्सव शांततेत पार पाडण्याचे पोलिसांचे नियोजन

भुसावळ : आगामी सण-उत्सव, महापुरुषांची जयंती पाहता पोलिसांनी विघ्नसंतोषींच्या शहरबंदी, गाव बंदीचे प्रस्ताव प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे दाखल केले होते. त्यानुसार शहर, बाजारपेठ आणि तालुका पोलिस ठण्याच्या हद्दीतील 29 जणांना 9 ते 16 या काळात शहर बंदीचे आदेश निघाले आहेत. यात सर्वाधिक आठ जण तालुक्यातील वराडसीम येथील आहेत.

सण-उत्सव शांततेत पार पाडण्याचे नियोजन
कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच सण-उत्सव, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम पूर्वीच्या उत्साहात साजरे होत आहेत. या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागातील 29 जणांच्या शहर बंदीचे प्रस्ताव तयार करून प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवले होते. या प्रस्तावांसोबत संबंधितांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सादर केली. या अनुषंगाने प्रांतांनी 16 एप्रिलपर्यंत 29 जणांना शहर बंदीचे आदेश काढले.

आदेशाचे उल्लंघण केल्यास दाखल होणार गुन्हा
प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 13, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी आठ संशयीतांना शहर बंदी करण्यात आली असून त्यांनी उल्लंघण केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल शिवाय ज्यांना शहरबंदी आणि गावबंदी केली आहे, त्यांच्यावर पोलिसांचे विशेष लक्ष असेल व ग्रामीण भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल, असे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.