भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातही ‘कोरोनाची धडक’

0

भुसावळ : शहरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही धडक दिल्याने ग्रामीण भागातील जनतेत भीती पसरली आहे. आतापर्यंत केवळ भुसावळात थैमान घालणार्‍या कोरोनाने आता तालुक्यातील खडका गावातही शिरकाव केल्याने ग्रामीण जनतेनेदेखील आता अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचा सूर व्यक्त आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात सुरुवातीला दोन, नंतर दहा व रात्री उशिरा पुन्हा एकाला कोरोनाची लागण झाल्याने भुसावळातील बाधीतांचा आकडा तब्बल 54 वर पोहोचला तर एकाच दिवसात तब्बल 13 बाधीत रुग्ण वाढल्याने प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे.

भुसावळातील 11 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळात कोरोनाने शहरात धडक दिल्यानंतर शनिवारपर्यंत भुसावळातील 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर यातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे शिवाय नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्जार्च देण्यात आला असून उर्वरीत 34 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 257 वर
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 257 इतकी झाली आहे तर त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर 33 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, प्रशासनाच्या माहितीनुसार, एका बाधीत व्यक्तीचा अहवाल पुन्हा पॉझीटीव्ह आल्याने बाधीतांची संख्या 257 इतकी झाली आहे.

भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव
भुसावळ शहरात आतापर्यंत कोरोनाबाधीत आढळून येत असतानाच शनिवारी मात्र तालुक्यातील खडका गावातही बाधीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. शहरात कोरोना नियंत्रणासोबत आता ग्रामीण भागातही फैलाव रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवण्याची गरज आहे. डीवायएसपी गजानन राठोड, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदींनी गावाला भेट देत रुग्ण राहत असलेल्या परीसराची पाहणी केली. बाधीत रुग्णाचा रहिवास असलेला परीसर सॅनिटाईज करण्यात आला तसेच एक किलोमीटरचा परीसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भुसावळातील रींग रोड भागात शनिवारी एक बाधीत आढळल्याने शहरात पुन्हा नव्याने एक कंटेन्मेंट झोन वाढला असल्याचे मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी सांगितले.

घरी रहा, सतर्क रहा
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी घरातच रहावे शिवाय अति अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना तोंडाला मास्क वा रूमाल बांधावा, असे आवाहन ‘दैनिक जनशक्ती’ने केले आहे.

Copy