Private Advt

भुसावळात 33 किलो गांजासह दोघे जाळ्यात

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची नाकाबंदी दरम्यान कारवाई : धुळ्यातील संशयीतांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ : चारचाकी वाहनातून धुळ्याकडे होणारी गांजा तस्करी बाजारपेठ पोलिसांनी गस्तीदरम्यान रोखत 33 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी धुळ्यातील दोघांना अटक करण्यात आली तर दोघे पासार झाले असून त्यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपींना रेल्वेतून झालेल्या वाहतुकीतून हा गांजा मिळाला असून तो वाहनाद्वारे ते धुळे येथे नेत असताना कारवाई करण्यात आली. या प्रकरणी स्वीप्ट चालक विजय वसंत ठिवरे (46, घर क्रमांक 105, मिरजकर नगर, चाळीसगाव रोड, धुळे) व नंदकिशोर हिरामण गवळी (28, रा.पवन नगर, चाळीसगाव रोड, धुळे) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी दोघा आरोपींना भुसावळ न्यायालयात न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गस्तीदरम्यान पोलिसांची कारवाई
गुरुवारी मध्यरात्री बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार लतीफ शेख, कॉन्स्टेबल प्रणय पवार हे रेल्वे स्टेशन परीसरात नाकाबंदी करीत असताना मध्यरात्री 2.25 वाजेच्या सुमारास मारोती स्वीप्ट (एम.एच. 01 बी.टी.6682) हिची तपासणी केली असता वाहनातील प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने वाहनाची डिक्की उघडून तपासणी सुरू असतानाच दोघे संशयीत बसस्थानकाकडून पसार झाले तर वाहनाच्या डिक्कीतील प्लॅस्टीक बॅग उघडल्यानंतर त्यात गांजा आढळल्याने वाहनासह दोघांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी स्वीप्ट चालक विजय वसंत ठिवरे (46, घर क्रमांक 105, मिरजकर नगर, चाळीसगाव रोड, धुळे) व नंदकिशोर हिरामण गवळी (28, रा.धुळे) यांच्यासह सतीश व ज्ञानेश्वर (पूर्ण नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेला गांजा तब्बल 33 किलो असून त्याचे त्याचे बाजारमूल्य एक लाख 65 हजार आहे तर तीन मोबाईलसह पाच लाखांची चारचाकी मिळून सहा लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक भोये, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, पोलिस शिपाई प्रणय पवार, पोलिस हवालदार लतीफ शेख आदींनी केली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, नाईक किशोर महाजन करीत आहेत.

आरोपींना 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
अटकेतील आरोपी विजय ठिवरे व नंदकिशोर गवळी यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. तपासाधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यावेळी उपस्थित होते.

जामिनावर सुटका केला गुन्हा
या गुन्ह्यात चार संशयीतांची नावे निष्पन्न झाली असून दोघे पसार झाले आहेत. दोन संशयीत गांजा प्रकरणात कारागृहात होते व दोन दिवसांपूर्वीच त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा तेच उद्योग सुरू केल्याचे समजते. विशेष म्हणजे आरोपींना मनमाड येथे गांजा मिळणार होता मात्र रेल्वेला विलंब झाल्याने संशयीत शिर्डी येथून दर्शन आटोपून भुसावळात चारचाकीने आले मात्र नाकाबंदीदरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या. आता पसार संशयीतांच्या शोधासाठी धुळे पोलिस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.