भुसावळात हजारो रुपयांचा गुटखा पकडला

भुसावळ : शहरातील डिस्को टॉवरजवळील महालक्ष्मी प्रोव्हीजनजवळील मोकळ्या जागेतून बाजारपेठ पोलिसांनी हजारो रुपये किंमतीचा गुटखा मंगळवारी दुपारी जप्त केला. घटनास्थळावरून संशयीत पसार झाला असून अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, एएसआय गयासोद्दीन शेख, हवालदार संजय भदाणे, संजय पाटील, समाधान पाटील यांना बाजारपेठेत गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी दुपारी कारवाई केली. महालक्ष्मी प्रोव्हीजनजवळ पार्सल आल्यानंतर पोलिसांनी ते ताब्यात घेतल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात विमल गुटखा आढळला. संशयीताने मात्र यावेळी धूम ठोकली. रात्री उशिरा गुटख्याची मोजणी सुरू असल्याने नेमका किती रुपयांचा गुटखा पकडला याची माहिती कळू शकली नाही.