Private Advt

भुसावळात स्व.निखील खडसे स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धा : 9 ते 13 दरम्यान शहरात आयोजन

अनिकेत पाटील व मित्र परीवारातर्फे भुसावळात प्रथमच स्पर्धेचे आयोजन : अनिकेत पाटील व प्रा.सुनील नेवे यांची पत्रकार परीषदेत माहिती

भुसावळ : शहरातील आरपीडी रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान अनिकेत पाटील व मित्र परीवारातर्फे स्व.निखील खडसे स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्या-परराज्यातील 32 संघ सहभागी होणार असून स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास भारतीय संघाचे माजी कप्तान मोहम्मद अझरुद्दीन उपस्थित राहणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक अनिकेत पाटील व माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणाजवळील अनिकेत पाटील यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

महाराष्ट्र भरातील संघ सहभागी होणार
रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य तथा महालक्ष्मी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल माहिती देताना सांगितले की, स्व.निखील खडसे यांना क्रिकेटची उत्तम जाण होती शिवाय स्पर्धांच्या माध्यमातून ते अनेक खेळाडूंशीदेखील जुळले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भुसावळातही भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करावे, असा हेतू मनात आला व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी निर्णयाचे कौतुक करीत सहकार्याचीही ग्वाही दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून भुसावळातील खेळाडूंच्या कौशल्यालादेखील वाव मिळणार असून भुसावळचे नावही सर्वदूर झळकणार असल्याचा विश्वास अनिकेत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

मैदानाचा व्यावसायीक वापर आता पूर्णपणे थांबणार
माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे म्हणाले की, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याशी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल चर्चा केल्यानंतर त्यांनी सहकार्य करण्याची ग्वाही देत मैदानाच्या सुशोभीकरणाला सुरूवातही केली. आता ट्रॅक तयार झाल्यानंतर पहाटेच्या वेळी रस्त्यावर नागरीक धावण्याऐवजी मैदानावरच धावतील त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल शिवाय यापुढे या मैदानाचा व्यावसायीक वापर होणार नाही याची हमी पालिका प्रशासनाने दिली आहे. मैदानावर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवेशद्वारावर गेट लावण्यात येईल त्यामुळे अप्रिय घटना टळण्यास मदत होईल शिवाय मैदानाच्या भिंतीवर हॉकी, क्रिकेट व कबड्डी आदी खेळांबाबत डिझाईन बनवले जात असून त्या माध्यमातून मैदान अधिक आकर्षक बनवले जात आहे.

विजेत्यांना आकर्षक बक्षीस : मो.अझरुद्दीन येणार
प्रा.सुनील नेवे म्हणाले की, भव्य क्रिकेट स्पर्धेचे 9 ते 13 दरम्यान आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील 32 संघ त्यात सहभागी असतील. प्रत्येक दिवशी सात मॅचेस होतील व एक मॅच सहा ओव्हरची असेल तर 13 रोजी सकाळी 10 वाजता सेमी फायनल व फायनल सामना होईल. हा सामना आठ ओव्हर (षटकांचा) असेल तर दुपारी तीन वाजता विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल. बक्षीस वितरण कार्यक्रमास भारतीय संघाचे माजी कप्तान मो.अझरूद्दीन यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असे आहे बक्षिसाचे स्वरूप
प्रथम विजेत्या संघास 51 हजार, द्वितीय संघास 31 हजार तर तृतीय संघास 21 हजारांचे पारीतोषिक ट्रॉफी दिली जाईल या शिवाय मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर, हॅॅट्रीक, सलग तीन षटकार, उत्कृष्ट कॅच (झेल), फिल्डींग, उत्कृष्ट व्हिकेट किपर यांना रोख पारीतोषिक दिले जाणार आहे. हम्पायर्स म्हणून जळगावातील दोन तर भुसावळातील तिघा तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे शिवाय क्रिकेट समालोचकांची नियुक्ती करण्यात आली शिवाय स्पर्धा यशस्वीतेसाठी सुमारे 25 समित्या गठीत करण्यात आल्याचे प्रा.नेवे म्हणाले.

9 रोजी माजी मंत्री खडसेंच्या हस्ते उद्घाटन
बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते टॉस करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी खासदार रक्षा खडसे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक धीवरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे आदींची उपस्थिती राहणार आहे.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला माजी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, अनिकेत पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, अर्षद अली, गुड्डू भाई, वसीम खान (अप्पू), आकाश भोळे, देवा वाणी, बापू महाजन आदींची पत्रकार परीषदेला उपस्थिती होती. दरम्यान, पत्रकार परीषदेनंतर पदाधिकार्‍यांनी मैदानाची पाहणी केली.