भुसावळात शासकीय बाबूंची लेटलतिफी : तीन तास रखडली स्वॅब प्रक्रिया

0

भुसावळ (गणेश वाघ) : सरकारी काम अन् चार महिने थांब म्हणीचा प्रत्यय भुसावळकरांना प्रत्यक्षात गुरुवारी आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर लोकप्रतिनिधींनी नागरीकांच्या सोयीसाठी प्रभागात स्वॅब देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केल्यानंतर शहरात 9 ते 23 जुलैदरम्यान शहरातील दहा केंद्रावर स्वॅब देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्वॅब देण्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी मात्र सरकारी बाबूंच्या लेटलतिफीचा त्रास भुसावळकरांना सोसावा लागला. प्रत्यक्षात 12 ते दोन दरम्यान स्वॅब घेण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात पावणेतीन वाजेच्या सुमारास सुरू झाली. शहरातील तु.स.झोपे विद्यालयात हा प्रकार घडल्याने नागरीकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. दुपारनंतर एकूण 105 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वयोवृद्धांना प्रचंड मनस्ताप
स्वॅब घेण्याची वेळ ही दुपारी 12 ते 2 असल्याने वेळेत संंबंधित यंत्रणेने उपस्थित राहणे गरजेचे असतानाच आरोग्य विभागाचे आणि प्रशासनाचे कोणीही अधिकारी तेथे न फिरकल्याने वयोवृद्धांनी संताप व्यक्त केला. सकाळी 9 ते 12 यावेळात नागरीकांना त्यांची नाव नोंदणीची वेळ देण्यात आली होती तर दुपारी 12 ते 2 या दोन तासात आलेल्या नागरीकांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याने सकाळीच दाखल झालेल्या वयोवृद्धांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला. दरम्यान, तहसीलदार दीपक धीवरे, कोविड रुग्णालयाचे डॉ.देवर्षी घोषाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.