Private Advt

भुसावळात विवाहितेचा खून : आरोपी पतीला पाच दिवसांची पोलिस कोठडी

भुसावळ : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पालिकेत कंत्राटी पद्धत्तीने कामावर असलेल्या आरोपी पतीनेच चाकूचे वार करीत पत्नीचा खून केल्याची घटना शहरातील आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागे मंगळवारी रात्री घडली होती. या प्रकरणी आरोपी शुभम बारसे (26) यास अटक करण्यात आली होती. आरोपीला गुरुवारी अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

संशयाने घेतले विवाहितेचे प्राण
कवाडे नगरातील रहिवासी असलेल्या सुचिता शुभम बारसे (25) हिने पहिल्या पतीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शुभम बारसेशी विवाह केला होता. पहिल्या पतीपासून असलेल्या चार वर्षीय मुलासह दुसरा पती शुभमपासून झालेल्या दोन वर्षीय मुलासोबत विवाहितेचा संसार सुरू असताना दोघांमध्ये खटके उडू लागल्याने सुमारे चार ते सहा महिन्यांपासून विवाहितेने नातेवाईकांकडे आसरा घेतला होता. मंगळवार, 28 रोजी मुलाला घेवून जावे म्हणून सुचिताने पती शुभमला फोन केला व त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. मुलाला घेवून गेल्यानंतर शुभमने विवाहितेला सोबत घेत आरपीडी रस्त्यावरील सात नंबर चौकीमागे नेत तिच्यावर चाकूने हल्ला करीत व नंतर गळा आवळून खून केला व नंतर पळ काढला. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपी पतीला संशय असल्याने त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी
सुचिता बारसे या विवाहितेच्या खून प्रकरणी तिचे वडील ओमप्रकाश खरे यांनी भुसावळ शहर पोलिसात बुधवारी रात्री फिर्याद दिल्यानंतर शुभम बारसे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक केल्यानंतर गुरुवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपीने खून नेमका का व कसा केला? या प्रकारात आणखी कुणी सहभागी होते का? आदी बाबींचा आता पोलिस कोठडीत उलगडा होणार आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.

प्रेमसंबंधातून विवाह मात्र संशयाने केला घात
मयत सुचिता व शुभम यांनी शिक्षण सोबतच घेतले व यावेळी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सुचिताच्या वडिलांनी शुभमला लग्नाविषयी विचारले त्यावेळी त्याने शिक्षण अपूर्ण असल्याचे सांगून नकार दिल्याने दुसरीकडे तिचा विवाह लावण्यात आला मात्र सुमारे दोन वर्षानंतर सुचिता पतीपासून विभक्त होवून भुसावळात परतली व पुन्हा शुभमशी तिने विवाह केला मात्र पतीपासून झालेल्या मुलाचा सांभाळ करण्यावरून उभयंतांमध्ये खटके पडले तर शुभमच्या मनात संशयाचे भूत शिरल्याने विवाहिता प्राणाला मुकली तर दोघाही मुले आई-वडीलांच्या प्रेमाला पारखी झाली.