भुसावळात रेल्वे कर्मचार्‍यास मारहाण करून लुटले

भुसावळात शहरातील गार्ड लाईन जवळील घटना : 53 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला

भुसावळ : रेल्वेतील लोकोपायलट ड्युटीवरून घरी जात असताना चौघा संशयीतांनी त्यांचा रस्ता अडवत मारहाण करून मोबाईलसह सोन्याची चैन व एक हजार 300 रुपयांची रोकडसह कागदपत्रे बळजबरीने हिसकावल्याची घटना 20 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चौघा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघा अनोळखींविरोधात गुन्हा
रेल्वेतील सहा.लोकोपायलट चंदन अनिरुद्ध प्रसाद (28, संभाजी नगर, भुसावळ) हे सोमवार, 20 रोजी रात्री साडेबारा वाजता आपली ड्युटी संपवून घराकडे निघाले असता गार्ड लाईन रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ चार अनोळखींनी त्यांचा रस्ता अडवत लोखंडी फायटरने तोंडावर मारहाण करीत दुखापत केली तसेच प्रसाद यांच्या गळ्यातील दिड तोळे वजनाची चैन, मोबाईल तसेच एक हजार 300 रुपयांची रोकड व अन्य कागदपत्रे मिळून सुमारे 53 हजार 500 रुपयांचा ऐवज हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी प्रसाद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात भादंवि 392, 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक हरीष भोये, नाईक योगेश महाजन करीत आहेत.

अपर पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
जबरी चोरीची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक दयानंद यादव, उपनिरीक्षक नंदलाल राम, उपनिरीक्षक समाधान वाहुळकर आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान, मंगळवार, 21 रोजी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक दिलीप भागवत आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली

Copy