भुसावळात रेमडेसीव्हरची ब्लॅकमध्ये विक्री : बडे मासे पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान

पुरवठा करणार्‍या चेनच्या मुसक्या आवळण्याची गरज : ब्लॅकमध्ये इंजेक्शन घेणार्‍यांवरही दाखल व्हावा गुन्हा

भुसावळ : कोरोना रुग्णांसाठी लागणार्‍या रेमडेसीव्हर इंजेक्शनची तब्बल 20 ते 25 हजारात विक्री करणार्‍या दोघांच्या बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी लॅब चालक विशाल शरद झोपे (28, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (18, मानमोडी, ता.बोदवड) यांना अटक होती. अटकेतील आरोपी प्यादे असलेतरी मुळ सूत्रधार दुसरेच आहेत त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळणेदेखील तितकेच गरजेचे आहे शिवाय आरोपींनी 30 ते 35 जणांना 25 ते 25 जणांना ब्लँकमध्ये इंजेक्शन विकल्याने त्यांच्याही चौकशी होणे गरजेचे आहे.

डमी ग्राहक पाठवून केली कारवाई
बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये चढ्या दराने रेमडेसीव्हर इंजेक्शनची मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करण्यात आली व अचानक धाड टाकून आरोपींनी रुमालात गुंडाळलेले व एक फुटलेले इंजेक्शन आढळल्याने ते जप्त करण्यात आले. जप्त इंजेक्शनमध्ये शंभर एमजीचे हॅड्रा कंपनीचे तीन (प्रत्येकी किंमत 5400) व रेमडीक कॅडीला कंपनीचे एक इंजेक्शन (किंमत 3400) असे एकूण 19 हजार 600 रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले. पोलिसांना हॅड्रा कंपनीचे एक फुटलेले इंजेक्शन आढळले मात्र त्याची किंमत लावण्यात आली नाही.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, ईश्‍वर भालेराव, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली. कारवाईदरम्यान दोन पंचांना सोबत घेण्यात आले तर एफडी निरीक्षक अनिल माणिकराव यांनी इंजेक्शनची तपासणी करून ते अधिकृत असल्याचे सांगितले. बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस चौकशीत लॅब मालकाने आतापर्यंत 15 ते 25 हजार रुपये दराने भुसावळात आतापर्यंत 30 ते 35 जणांना रेमडेसीव्हरची विक्री केल्याची माहिती दिली असून त्यानुषंगाने पोलिसांनी दोन संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.