भुसावळात रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास : तासाभरात हटवल्या 40 लोटगाड्या

0

शहर वाहतूक शाखेसह बाजारपेठ पोलिसांची धडक मोहिम : वजनकाट्यासह सिलिंडरही केले जप्त

भुसावळ- शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पालिका व पोलिस प्रशासन धडक मोहिम राबवत पहिल्याच दिवशी बुधवारी जामनेर रस्त्यावर धडक कारवाईला सुरुवात केल्याने लोटगाडी चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. जामने रस्त्यावरील दुकानांसह लोटगाड्या बाजारपेठ व शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या तासभरात हटवल्याने अनेक वर्षानंतर रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला. प्रसंगी पोलिसांनी काही दुकानदारांचे वजनकाटे, गॅस सिलेंडर जप्त केले. शहरातील रस्त्यांवर बेशिस्तपणे लोटगाडी चालक गाड्या लावत असल्याने वाहतूक कोंडीसह पादचार्‍यांना मार्ग काढणेही कठीण झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी बैठकही घेवून नियोजन करण्यात आले. आगामी दोन महिन्यांच्या काळात शहरात फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार असून प्रमुख मार्गावर पालिकेकडून पांढरे पट्टे मारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रस्ते झाले मोकळे ; वाहनधारकांना दिलासा
शहरातील जामनेररोडवर मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह कापड विक्रेते, ज्यूस विक्रेते, वडापाव, चायनीज विक्रेते, भाजीपाला विक्रेते, भेळ गाड्या आदी थांबत असल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती शिवाय पादचार्‍यांना चालण्यासदेखील साधी जागा नव्हती. विक्रेत्यांनी तर पदपथावरही अतिक्रमण केले होते. बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी जामनेररोड, मॉडर्न रोड, सराफ, बाजार, अप्सरा चोक, डीस्को टॉवर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर, ब्राम्हण संघ परिसर आदी भागात जाऊन पाहणी करून रस्त्यावरील हातगाड्या दूर करण्याचा निर्णय घेतला. शहरात सर्वात जास्त रस्ता अप्सरा चौकात अरूंद झाला असून तेथून महिलांना चालणेही जिकरीचे झाल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील रस्ते मोकळे करायचे असे पवार यांनी ठरवून मुख्याधिकारी यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेत बुधवारपासून कारवाईचे नियोजन केले.

धडक कारवाईनंतर उडाली खळबळ
बुधवारी दुपारी 1.20 वाजता निरीक्षक देविदास पवार आणि शहर वाहतूक शाखेेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी पोलिस पथक सोबत घेत जामनेररोड गाठला. रस्त्यावर असलेल्या सर्वच हातगाडीधारकांना कायदेशीर कारवाईचा ईशारा दिला मात्र नाहाटा चौफुलीवरून परत येतानाही ज्या दुकानदारांनी आणि हातगाडी वाल्यांनी दुकाने हटवली नव्हती त्यांना रीतसर मेमो देत कारवाईला सुरुवात होताच दुकानदारांसह लोटगाडी चालकांच्या गोटात खळबळ उडाली. ज्या दुकानदारांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले नाही ते पोलिसांना सूचना देऊन हटविण्यात आले. यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांच्या कारवाईमुळे अन्य दुकानदारांनी सुध्दा त्यांची दुकाने आवरती घेतली. पोलिस प्रशासनाच्या या कारवाईचे शहरवासीयांमधून स्वागत होत असून दररोज अशी धडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. शहरातील सराफा बाजारातील मरीमाता मंदिराजवळ याचपद्धत्तीने कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.