Private Advt

भुसावळात माजी महसूलमंत्री खडसे स्पष्टच म्हणाले : महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न

भुसावळात रस्ता उद्घाटनप्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे : जनतेला संयम ठेवण्याचे आवाहन

भुसावळ : महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जात असून दोन्ही समाजांनी आता संयमाने भूमिका हाताळण्याची गरज आहे. देशात महागाई गगनाला भिडली असून खतांसह इंधन, तेलाचे दर वाढले आहेत. या प्रश्नी आता आंदोलनाची गरज असल्याचे स्पष्ट माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता खडका रोडवरील रस्ता कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

सर्वसामान्यांना दिलासा मिळणारी भूमिका मांडावी
राज्यात प्रार्थनास्थळासमोर हनुमान चालिसा लावण्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली. खडसे म्हणाले की, काही शक्ती महाराष्ट्राचे चांगले वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र दोन्ही समाजांनी ही परीस्थिती संयमाने व शांततेने हाताळण्याची गरज आहे. देशातील महागाईचा आगडोंब उसळला असून खतांच्या किंमती वाढल्या आहेत त्यामुळे या विषयावर आता आंदोलने होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. भुसावळ शहरात संथगतीने का होईना विकासकामांना सुरूवात झाली असून रस्ते काम टाकत असल्याचे ते म्हणाले. शहरातील उद्यानांनी कात टाकली असून अनेक सुधारणा होत आहेत शिवाय सात हजार सहाशे घरांचा प्रश्न खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागल्याचे ते म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदींची उपस्थिती होती. दरम्यान, सुभाष पोलिस चौकी-रजा टॉवर-खडका चौफुली दरम्यानच्या रस्त्याचे पालिका फंडातून 88 लाख 98 हजार 914 रुपये खर्चातून डांबरीकरण करण्यात येत असल्याने वाहनधारकांसह रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास माजी स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे, शरीफ ठेकेदार, अ‍ॅड.बोधराज चौधरी, शफी पहेलवान, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, पुरूषोत्तम नारखेडे, शेख पापा शेख कालू, पृथ्वीराज पाटील, सुमित बर्‍हाटे, रईस लोधी, कंत्राटदार राहुल धांडे (जळगाव) आदींची उपस्थितती होती.

वाहनधारकांना मिळणार दिलासा : आमदार
अमृत योजनेची पाईप लाईन अंथरल्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली होती. बहुतांश ठिकाणी रस्त्यांची कामे झाली असलीतरी खडका रस्त्याच्या कामाल सुरूवात झालेली नव्हती मात्र आता कामाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली आहे. सुमारे 10 वर्षानंतर काम होत असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळेल, असे आमदार संजय सावकारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.