भुसावळात महिलेस मारहाण : अवैध सावकाराविरोधात गुन्हा

भुसावळातील अवैध सावकारी पुन्हा ऐरणीवर एक हजार रुपयांचे चार हजार वसुल करूनही आरोपीची दमदाटी

भुसावळ : एक हजार रुपये व्याजाने घेतल्यानंतर त्यापोटी चार हजार रुपये वसुल केल्यानंतरही महिलेला अश्लील शिविगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी भुसावळातील एकाविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा बाजारपेठ पोलिसात दाखल करण्यात आल्याने अवैध सावकारांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

मारहाण करीत अश्लील शिविगाळ
शहरातील पंचशील नगरातील रहिवासी प्रवीण चांदणे यांनी त्यांचा मित्र आरीफ यांचे वडील रफिक यांच्याकडून तीन महिन्यापूर्वी 25 टक्के व्याजदराने एक हजार रुपये घेतले मात्र या पोटी चांदणे यांनी पिंजारी यांना चार हजार रूपये दिल्यावरही मुद्दल मिळाले नाही, व्याजच सुरू आहे, असे सांगत आरीफ पिंजारी मंगळवार, 7 रोजी सकाळी महिला रजनी प्रवीण चांदणे (पंचशील नगर, भुसावळ) यांना मारहाण करून अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी घरी आल्यानंतर पैशांची मागणी लागताच महिलेने आमच्याजवळ पैसे नाहीत, तुम्हाला आतापर्यत चार हजार रूपये दिले आहे त्यामुळे पती रात्री घरी आल्यावर हिशोब करू, असे सांगितल्याने आरोपीने महिलेचा हात धरून पिळला व अश्लिल शिविगाळ केली. या प्रकरणी महिलेने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत दिलेल्या फिर्यादीवरून आरीफ रफीक पिंजारी (रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याच्याविरूध्द अवैध सावकारीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक महेश घायतड करीत आहेत.

अवैध सावकारी मोडीत काढणार : पोलिस उपअधीक्षक
शहरातील किती सावकारांकडे सावकारीचा परवाना आहे याची माहिती काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून यानंतर अवैध सावकारांच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.