भुसावळात महिनाभरात तिसर्‍यांदा धुम स्टाईल मंगळसूत्र लांबवले

0

भुसावळ- शहरात धूम स्टाईल चोर्‍या होण्याच्या प्रकारात वाढ झाली असून महिनाभरात तिसर्‍यांदा शतपावली करणार्‍या विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्यात आल्याने महिलांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिस प्रशासनाकडून चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी प्रतिभा विजय पाटील या आपल्या मुलीसह रविवारी रात्री 9.30 वाजता हुडको कॉलनी परीसरात शतपावली करीत असताना दुचाकीवर धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी एक तोळे वजनाचे व 30 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक के.टी.सुरळकर करीत आहेत.

आधीच्या दोन चोर्‍यांचा तपास थंडबस्त्यात
बुधवार, 14 रोजी गजानन महाराज नगरातील पीपल्स कॉलनीतील रहिवासी रवींद्र पंडीत इंगळे हे त्यांच्या पत्नी सुरेखा यांच्यासोबतरात्री 9.15 वाजता शतपावली करीत असताना पॅशन प्रो कंपनीच्या दुचाकी (एम.एच.19-2446) वरून आलेल्या चोरट्यांनी 90 हजार रुपये किंमतीचे व 32 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबवले होते तर त्याच्या एक आठवड्यापूर्वीदेखील धूम स्टाईल चोरी झाली होती मात्र या चोर्‍यांचादेखील उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीक आता प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहेत.

Copy