Private Advt

भुसावळात महागाईविरोधात राष्ट्रवादीचा यल्गार

केंद्र सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा : आंदोलनाने वेधले लक्ष

भुसावळ : वाढत्या इंधन दरासह घरगुती गॅससह खाद्य तेलाचा दराचा भडगा उडाल्याने सर्वसामान्य जनतेला जगणे असह्य झाल्याने महागाई वाढीविरोधात शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून अनोखे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क कार्यालय नवशक्ति कॉम्प्लेक्स ते तहसील कार्यालयपर्यंत काढून आंदोलन करण्यात आले.

महागाईने जनता होरपळली
घरगुती गॅस, खाद्य तेलाचा भडका उडाल्याने महागाईने जनता पोळली आहे. पेट्रोलसह डिझेलचे दर दिवसाला वाढत असून शेतकर्‍यांशी संबंधित कृषी मालाला भाव नाही मात्र रासायनिक खतांच्या किंमती व बियाणांच्या किंमतीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
युपी सरकारच्या काळातील सर्वच वस्तूंच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जास्त होत्या, असे समजून जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपच्या सरकारला बहुमत दिले मात्र 2014 नंतर मोदी यांनी अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास केला आहे. उज्ज्वल योजनेंतर्गत गॅस दिले मात्र त्याची किंमत जनतेला परवडत नाही. खाद्यतेल दुपट्टीने वाढले म्हणून सर्वसामान्यांना तेही परवडत नाही. एकीकडे रोजगार हातचा गेला आणि दुसरीकडे महागाईचा राक्षस निर्माण केला. देशातल्या अनेक सरकारी कंपन्या विक्रीला काढल्या. याबाबत केंद्र सरकारला काहीही देणे घेणे नाही व जनतेला वार्‍यावर सोडून दिल्याने या बाबीचा आंदोलनात निषेध करण्यात आला.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना पवार, युवक जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, पृथ्वीराज पाटील, जिल्हा सरचिटणीस अतुल चव्हाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस सरजू तायडे, अनिस लोधी, रोहण सूर्यवंशी, उसामा खान, एजाज खान, विशाल नारखेडे, प्रमोद पाटील, कंडारी सरपंच पती नितीन कोळी, किन्हीचे माजी सरपंच प्रदीप कोळी, चंद्रकांत कोलते, धनराज भोई, सोनल झोपे, आनंद हुसळे, रुपेश बाविस्कर, नितीन वराडे, धर्मराज तायडे, अनिल पाटील, दत्तू सुरवाळे, हर्षल चौधरी, मोहित जोशी, भूषण आव्हाड, आकाश ढिवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.