भुसावळात सुनेने केला सासूचा खून

भुसावळ : सासूशी झालेल्या भांडणानंतर सुनेने विळ्याचे सपासप वार करून सासूचा खून केल्याची घटना शहरातील प.क.कोटेचा शाळेच्या प्रवेशद्वारावरच बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे (75) असे मयत सासुचे तर उज्वला रवींद्र सोनवणे (38) असे खून करणार्‍या सुनेचे नाव आहे. शहर पोलिसांनी आरोपी सूनेस अटक केली आहे. दरम्यान, उज्वला सोनवणे या मनोरुग्ण असल्याचीही चर्चा आहे.

पती घराबाहेर जाताच सुनेने केला सासूचा खून
भुसावळ शहरातील गजानन महाराज नगर भागात प.क.कोटेचा शाळा असून या शाळेत गेल्या आठ वर्षांपासून वॉचमन म्हणून रवींद्र सोनवणे (45) नोकरीस आहेत. शाळेने सोनवणे यांना वास्तव्यासाठी पत्र्याची खोली दिली असून ते पत्नी उज्वला, आई द्वारकाबाई व दहा वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहेत. बुधवार, 3 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रवींद्र सोनवणे हे किराणा घेण्यासाठी घराबाहेर पडताच सासु-सुनेमध्ये कुठल्यातरी कारणावरून शाब्दीक वाद होवून तो विकोपाला गेला व द्वारकाबाई या घराबाहेर पडताच सून उज्वला हिने त्यांच्या डोक्यावर व पाठीवर विळ्याने सपासप करून त्यांना ठार केले. किराणा घेवून रवींद्र सोनवणे घरी आल्यानंतर त्यांना घटनेचा प्रकार लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसांना माहिती कळवली.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
खुनाची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक संदीप दूनगहू, सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे तसेच पोलिस कर्मचार्‍यांनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आली असून रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मनोरुग्ण सुनेला शहर पोलिसांनी अटक केली असून तिची रात्री उशिरा खोलवर चौकशी सुरू आहे.

पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा
बुधवारी रात्री उशिरा शहर पोलिसात मयत द्वारकाबाई सोनवणे (77) यांच्या खून प्रकरणी सून उज्ज्वला पंढरीनाथ सोनवणे (मूळ रा.कठोरा, ता.जळगाव, ह.मू.प.क.कोटेचा शाळा, भुसावळ) विरुद्ध पती रवींद्र पंढरीनाथ सोनवणे (भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एएसआय मोहम्मद अली सैय्यद यांनी फिर्याद दाखल करून घेतली. तपास निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

Copy