Private Advt

भुसावळात भीषण अपघात : आजीसह दीड वर्षीय नात ठार

भरधाव इंडिगोचे टायर फुटल्यानंतर टँकरवर आदळली; वाहतूक विस्कळीत

 

। भुसावळ प्रतिनिधी ।

 

छत्तीसगडकडून कल्याणकडे भरधाव वेगाने निघालेल्या इंडिगो वाहनाचे खडका चौफुलीवर अचानक टायर फुटल्याने हे वाहन उभ्या असलेल्या टँकरवर धडकून झालेल्या भीषण अपघातात ६२ वर्षीय महिलेसह तिच्या दिड वर्षीय नातीचामृत्यू झाला तर दाम्पत्य या अपघातात गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवार, २ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, अपघातात इंडिगो वाहन चक्काचूर झाले आहे. रस्त्यावर उभ्या बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या वाहनांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होण्याची अपेक्षा वाहनधारकांकडून होत आहे.

 

» समजलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथून इंडिगो (सी. जी.डी.एफ.५०४७) ही कल्याणकडे निघाली असताना खडका चौफुली आल्यानंतर अचानक वाहनाचे मागील बाजूचे टायर फुटले व इंडिगो उभ्या टँकरवर आदळली. या अपघातात वाहन चालक दीपकसिंग आलुवालिया (३३, रायपूर, छत्तीसगढ़), गुंजन आलुवालिया (३०) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले तर दीपकसिंग यांची मुलगी बानी आलुवालिया (वय १.५), सुरेंदर कौर ( ६२, रायपूर, छत्तीसगढ) यांचा मृत्यू झाला. स्थानिक नगारीकांसह पोलिसांनी तातडीने जखमींना उपचारार्थ हलवले.

 

पोलीस प्रशासनाची वेळीच धाव

 

» अपघाताची माहिती कळताच शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक, पोलिस नाईक संदीप राजपूत, एएसआय शब्बीर तडवी, हवालदार राजेंद्र शिंदे, चालक सुनील शिंदे तसेच बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व सहकाऱ्यांनी धाव घेतली. जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.