भुसावळात भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू : दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

भुसावळ : भरधाव दुचाकी स्लीप होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारामागे बसलेला तरुण ठार झाला तर दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात व्हीआयपी कॉलनी, शिवपूर-कन्हाळा रोड येथे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात पवन अशोक चौधरी (22, रा.आनंद नगर, भुसावळ) या तरुणाचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला तर दुचाकीस्वार योगेश भंगाळे (मातृभूमी चौक, भुसावळ) जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
अपघात प्रकरणी साई पॅलेसचे मॅनेजर महादेव पुंजाजी किनगे (30, रा.103, गांधी नगर, गणपती चौक, येरवडा, पुणे) यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून दुचाकी चालक तथा संशयीत आरोपी योगेश भंगाळे (मातृभूमी चौक, भुसावळ) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश व पवन हे दुचाकी (एम.एच.19-9893) ने शहराकडे येत असताना व्हीआयपी कॉलनीजवळ दुचाकी घसरल्याने पवनच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यास रीदम रुग्णालयात व तेथून गोदावरीत हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले तर योगेशच्या पायाला मार लागल्याने त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. तपास सहा.निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत.