भुसावळात भंगार विक्रेत्यांमध्ये खळबळ : पहिल्याच दिवशी संचारबंदीनंतर पोलिसांकडून धडक कारवाई

भुसावळ शहरात पहिल्याच दिवशी 332 जणांविरूध्द कारवाई : संचारबंदीनंदर पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

भुसावळ : राज्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर बुधवार, 14 एप्रिलच्या 8 वाजल्यापासून राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरू होताच भुसावळ विभागातही प्रत्यक्षात पोलिसांनी धडक कारवाईला सुरूवात केली. विनाकारण बाहेर फिरणार्‍यांसह लॉकडॉऊनचे नियम मोडणार्‍या दुकानदारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी रात्री भुसावळात 332 जणांविरूध्द कारवाई करण्यात आल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली.

भुसावळात पोलिस अ‍ॅक्शन मोडवर
भुसावळात संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे स्वतः रात्री कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. बुधवारी पहिल्या दिवशी लॉकडाऊन उल्लंघनच्या 96 तर मोटार व्हेईकलच्या 236 केसेस करण्यात आल्या व या माध्यमातून 95 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने खळबळ उडाली तर गुरुवारीदेखील धडक कारवाई सुरूच होती. सरकारने ठरवून दिलेल्या वेळेतच दुकाने सुरू ठेवा त्यानंतर दुकाने उघडी दिसल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहायक पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्यासह अन्य अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी बुधवारी रात्री आठनंतर रस्त्यावर उतरले होते. संचारबंदीचे उल्लघंण करणार्‍या 96 जणांकडून प्रत्येकी 500 रूपये प्रमाणे पोलिसांनी दंड वसुल केला. यात पोलिसांनी 48 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. तर तीन सीट फिरणारे, विना परवाना वाहन चालविणारे अश्या 296 वाहनधारकांकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे दंड वसूल केला.
पोलिसांनी रात्री आठनंतर सुरू असलेल्या पान टपर्‍यांविरूध्द कारवाई केली. पान टपर्‍यांना प्रत्येकी एक हजार रूपये दंड वसूल केला. तर आईस्क्रीम विक्रेत्यांना दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. किराणा दुकानदारांना प्रत्येकी हजार रुपये दंड वसूल केला.

परवानगी नसतानाही सुरू ठेवली प्रतिष्ठाने
केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रतिष्ठान सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली असलीतरी काही व्यावसायीक जाणून बुजुन आपापली दुकाने सुरू ठेवत असल्याने अशा दुकानदारांवर पाच हजार रुपयांप्रमाणे दंडाची कारवाई केली जात असून त्यांना समज दिली जात आहे शिवाय वेळेचे उल्लंघण करणार्‍यांवरही कारवाई केली जात आहे.

अनावश्यक फिरणार्‍यांवर कारवाई : सोमनाथ वाघचौरे
शहरात संचारबंदीचे काटेकोरपणे पालन केले जात आहे शिवाय अनावश्यकरीत्या बाहेर फिरणार्‍यांवर दंडात्क कारवाई केली जात आहे. शहरात विविध फिक्स पॉईंट लावण्यात आले असून लॉकडाऊनचे उल्लंघण करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.

भंगार विक्रेत्यांमध्ये खळबळ
गुरुवारी भंगार विक्रेत्यांना दुकाने वा गोदाम सुरू ठेवण्याची परवानगी नसतानाही ती खुली ठेवण्यात आल्याने पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाखालील आरपीसीने तपासणी केल्याने व्यावसासीकांमध्ये खळबळ उडाली. संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.