भुसावळात बेवारस तीन बॅॅगांमधून तीन लाखांचा गांजा जप्त

Ganja worth three lakhs seized from three bags of homeless people in Bhusawal भुसावळ : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवरील वेटींग हॉलजवळ बेवारसरीत्या सापडलेल्या तीन बॅगांमधून 30 किलो वजनाचा व तीन लाख रुपये किंमतीचा गांजा रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी जप्त केल्याने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अनोळखी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गांजा तस्करी पुन्हा उघड
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाण्यासाठी होत असलेली गर्दी तसेच मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांची रेल्वे गाड्यांना गर्दी  पाहता रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी  11 वाजता रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक दीपक जी.पाटील, प्रधान आरक्षक जितेंद्र इंगले यांच्यातर्फे डॉगस्कॉडमधील वीरू या श्‍वानातर्फे तपासणी सुरू करण्यात आली तसेच आरपीएफ उपनिरीक्षक के.आर.तर्डे, आरक्षक योगेश पाटील, आरक्षक हंसराज वर्मा व भुसावळ लोहमार्गचे अनंतराव रेणुके  हे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरील जनरल वेटींग हॉलमध्ये गस्त घालत असताना सुरक्षा यंत्रझांना तीन संदिग्ध अवस्थेतील बेवारस बॅग आढळल्याने वरीष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली तसेच बॅग जप्त करण्यात आले.

30 किलो गांजा जप्त
डॉग स्कॉडच्या तपासणीनंतर बॅग उघडल्यानंतर दोन बॅगेत प्रत्येकी चार तर तिसर्‍या बॅगेत सात बंडल टेपने पॅकींग केलेले आढळले व नंतर हे बंडल उघडले असता त्यात गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. यावेळी रेल्वे स्थानक निरीक्षक राधा किशन मीना, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव, सहायक सुरक्षा आयुक्त बी.पी.कुशवाह यांनी भेट देत माहिती जाणली. जप्त केलेल्या गांजाचे वजन 30 किलो असून त्याचे बाजारमूल्य तीन लाख रुपये आहे.

लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल
लोहमार्ग निरीक्षक विजय घेर्डे, एएसआय सुनील इंगळे, एएसआय विकास पाटील, एएसआय भरत सिरसाठ यांच्या उपस्थितीत लोहमार्ग पोलिसांकडे गांजा सुपूर्द केल्यानंतर रात्रभ उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता संशयीत आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील गांजा तस्करी उघड झाली होती व आतादेखील गांजा आढळल्याने रेल्वेतून मोठ्या प्रमाणावर गुंगीकारक पदार्थांची वाहतूक होत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.