भुसावळात बेकायदा दारू विक्री : ढाबा मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील चाहेल ढाब्यावर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास अवैधरीत्या दारूची विक्री होत असqल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्याने त्यांनी छापा टाकून तीन हजार 120 रूपयांची विदेशी दारू जप्त केली. संचारबंदीच्या काळात सर्वत्र बंद असतांना दारू विक्री होत असल्याने पोलिसांनी कारवाई करीत ढाबा मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई

राष्ट्रीय महामार्गावरील चाहेल पंजाब ढाब्यावर दारू विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी गजानन राठोड यांना मिळाल्याने त्यांनी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना कारवाईच्या सूचना केल्यात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहायक निरीक्षक संदीप परदेशी, सहायक फौजदार तस्लीम पठाण, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, महेश चौधरी, रवींद्र बिर्‍हाडे, तुषार पाटील यांनी शुक्रवारी रात्री ढाब्यावर छापा टाकून तीन हजार 150 रुपयांची विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी रात्री उशीरा ढाब्याचे व्यवस्थापक कडू तुळशीराम पाटील (जुना सातारा, भुसावळ) व लखन एकनाथ घावरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात येवून दोघा आरोपींना अटक करण्यात आली होती तर नंतर ढाबा मालक गुरमंदरसिंग इंदरसिंग चाहेल यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.