Private Advt

भुसावळात प्रभाग रचनेत प्रस्थापीतांना धक्का

भुसावळ शहरात आता 25 प्रभाग तर नगरसेवकांच्या दोन जागा वाढल्या ; 50 नगरसेवक करणारे शहराचे नेतृत्व

भुसावळ : राज्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानच विरोधी पक्षासह महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा पवित्रा घेतला आहे मात्र दुसरीकडे निवडणूक आयोगाने प्रक्रिया पूर्ववत ठेवल्यानंतर गुरुवार, 10 रोजी जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका व नगरपरीषदेत प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. भुसावळ शहरात आतापर्यंत 24 प्रभागांच्या माध्यमातून 48 नगरसेवक निवडले जात होते मात्र आता नव्या प्रभाग रचनेनुसार 25 प्रभाग राहणार असून दोन नगरसेवक या माध्यमातून वाढल्याने एकूण 50 नगरसेवकांसाठी यापुढे निवडणूक होईल, हे स्पष्ट झाले आहे तर नव्या प्रभाग रचनेमुळे शहरातील अनेक प्रभागाती प्रस्थापीत नगरसेवकांना धक्का बसला आहे.

भुसावळातून आता 50 नगरसेवक निवडले जाणार
भुसावळ शहरात यापूर्वी 24 प्रभागाच्या माध्यमातून 48 नगरसेवक निवडले जात होते मात्र नव्या प्रभाग रचनेनुसार शहरात आता 25 प्रभाग असतील व त्या माध्यमातून 50 नगरसेवक निवडून येणार आहेत.

नव्या प्रभाग रचनेमुळे प्रस्थापीतांना धक्का
पालिकेने लोकसंख्येच्या आधारावर नव्याने प्रभाग रचना जाहीर केली असून त्यामुळे शहरातील विविध पक्षाच्या तत्कालीन काही नगरसेवकांना धक्का बसला आहे. विद्यमान निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रभागात समाविष्ट असलेला काही भाग अन्य प्रभागात समाविष्ट करण्यात आल्यानंतर त्यामुळे देखील आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही तर काही नगरसेवकांना मात्र नव्या प्रभाग रचनेमुळे काहीसा दिलासादेखील मिळाल्याचे सांगितले जात आहे.

17 मार्चपर्यंत सूचना व हरकती सादर करता येणार
प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधीत प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे 17 मार्चपर्यंत हरकती सादर करता येणार आहेत. प्रारुप रचना, प्रभागदर्शक नकाशे जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्ड, भुसावळ नगरपालिकेचे नोटीस बोर्ड, उपविभागीय कार्यालय भुसावळ, तहसील कार्यालय भुसावळ, तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व नगरपालिकेच्या संकेत स्थळावरही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांची शक्यता ?
राज्यात ओबीसी आरक्षण प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र विधेयकदेखील बहुमताने मंजूर करीत ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपालिका, जिल्हा परीषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे जाहीर केले होते, परंतु राज्य निवडणूक आयोगाने नियोजित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 15 नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया पूर्ववत ठेवत नगरपालिका प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्धी केली आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुका या वेळेतच आणि ओबीसी आरक्षणाशिवाय होतील, असे संकेत आहेत. यापूर्वी जिल्ह्यात गेल्याच जानेवारी महिन्यात बोदवड नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दोन टप्प्यात ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्याचे उदाहरण आहे.

भुसावळात प्रभाग आठबाबत हरकत दाखल
शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी प्रभाग रचनेबाबत हरकत नोंदवली आहे. नवीन प्रभाग क्रमांक 7 आणि 9 ची सीमा तयार करतांना मुख्य रस्ते, नैसर्गिक नाले आणि नद्या विचारात घेतलेल्या आहेत. 2016 मध्ये प्रभाग क्रमांक 8 (जुना) मध्ये असलेले भोई नगर, श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी परिसर नैसर्गिक नाले यांच्या सीमा निश्चित करून जुना प्रभाग 7 आणि आताचा नवीन प्रभाग 8 मध्ये सामील करण्यात आला परंतु जुना सातारा येथील मरीमाता मंदिर परीसर आणि मरीमाता मंदिर मागील परिसर मुख्य रस्ते, नैसर्गिक नाले यांच्या अनुषंघाने नवीन प्रभाग क्रमांक 7 मध्ये सामील करणे आवश्यक होते परंतु हेतू पुरस्सर हा भाग नवीन प्रभाग क्रमांक 8 मध्ये चुकीच्या पध्दतीने सामील करण्यात आल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. हा भाग प्रभाग आठमधून कमी करून प्रभाग क्रमांक सातमध्ये सामील करावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.