भुसावळात पोलीस उपनिरीक्षकांना मारहाण

करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूतसह आठ जणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा ः संशयीत आरोपी पसार

भुसावळ : बाजारपेठ पोलिसांचे पथक रात्रीच्या गस्तीवर असताना एका संशयीताला हटकल्यानंतर टोळक्याने बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकालाच जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील श्रीराम नगराजवळील हनुमान मंदिराजवळ शनिवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा अधोरेखीत झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार तथा करणी सेनेचा खान्देश अध्यक्ष निखील राजपूतसह आठ जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयीत पसार झाले असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

टोळक्याची पोलीस उपनिरीक्षकाला दादागिरी
या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी ते चालक दिनेश कापडणे यांच्यासह रात्र गस्तीवर असताना शहरातील विविध भागातून गस्त करीत श्रीराम नगरात पोहोचले असता हनुमान मंदिराजवळ दोन विना क्रमांकाच्या दुचाकीसह एक पांढर्‍या रंगाची झायलो दिसल्याने त्यांनी उभ्या असलेल्या संशयीताला नाव विचारले असता त्याने निलेश ठाकूर नाव असल्याचे सांगितले तर याचवेळी पाच ते सहा संशयीत तेथे जमले व निखील राजपूत याने मी उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अध्यक्ष असून माझ्यामागे राजकीय गॉडफादर असून माझे काही वाकडे होणार नाही, असा दम भरला तर निलेश ठाकूर व आकाश पाटील याने एक मर्डर किया है, एक और करेंगे, असे सांगत संघटीत टोळीच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी निखील राजपूतने तू नवीन अधिकारी आहे, नवीनसारखा रहा, असे सांगत मानेला दाबण्याचा प्रयत्न करीत मारहाण केली व माझ्याजवळील पिस्टलला तुला मारून टाकेल, अधी धमकीही दिली तसेच नकूल राजपूत याने शिविगाळ केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या गंभीर घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल आरोपी निखील राजपूतसह अक्षय न्हावकर उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, निलेश ठाकूर व अन्य एका अनोळखीविरोधात भाग पाच, गुरनं.307, 353, 332, 143, 147, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.

अपर पोलीस अधीक्षकांची भेट
उपनिरीक्षकाला मारहाण झाल्याच्या गंभीर घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह पोलिस पथकाने शनिवारी सकाळी श्रीराम नगरात जावून घटनास्थळाची पाहणी केली.

निखील राजपूत रेकॉर्डवरील गुन्हेगार : पोलीस निरीक्षक
निखील राजपूत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात दहा ते बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी दिली. भुसावळ बाजारपेठ व जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाकडून पसार आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

Copy