Private Advt

भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग : वॉण्टेडसह तिघे संशयीत जाळ्यात

भुसावळातील गुन्हेगारीचा बिमोडसाठी पोलिसांची मोहिम ः 11 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

भुसावळ : शहरातील गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी रात्री तीन पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात एक वॉण्टेड आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर दोन संशयीत अस्तित्व लपवून असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. 11 वाहनधारकांकडून दंड वसुल करण्यात आला शिवाय 32 पैकी 23 हिस्ट्रीशीटर घरीच आढळले तर एकही हद्दपार शहरात आला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाणे व नशिराबाद पोलिस ठाणे या हद्दीत अचानक मंगळवारी कोम्बिंग राबवण्यात आले. शहरातील वैतागवाडी, खडकारोड, रजा टॉवर चौक, महात्मा फुले नगर परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जाम मोहल्ला परीसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ, तालुका व शहर वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सामील झाले.

तीन संशयीत जाळ्यात
पोलिसांना 22 वॉण्टेड आरोपी हवे होते मात्र त्यातील केवळ एकाच्या मुसक्या आवळण्यात यश आले तसेच रात्री अंधाराचा फायदा घेऊन संशयीतरीत्या फिरणार्‍या नितीन संजय बोयत (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) यास टिंबर मार्केटजवळून तसेच अक्रम शेख फकीर मोहंमद (रा.बागवान गल्ली, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान 11 वाहनांची तपासणी करून त्यांना दंड करण्यात आला तर एक वाहन पोलिसांनी पडताळणीसाठी ताब्यात घेतले. 11 हद्दपारांची तपासणी केली मात्र एकही मिळाला नाही तर 32 हिस्ट्रीसीटरपैकी 23 जण पोलिसांना मिळून आल्याची नोंद करण्यात आली.

यांचा कोम्बिंगमध्ये सहभाग
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहरचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, तालुक्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे, नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहा.पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल नाईक, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहु, विनोदकुमार गोसावी, मंगेश गोंटला, अमोल पवार यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी, डीबी पथकातील कर्मचारी सहभागी झाले.