भुसावळात पूर्व वैमनस्यातून दोन गटात दंगल : 16 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

0

तिघा आरोपींना अटक : हाणामारीत दोन्ही गटातील तीन जण जखमी

भुसावळ- पूर्व वैमनस्याच्या कारणातून शहरातील न्यु एरिया वॉर्डात दोन गटात तुंबळ हाणामारी होवून तीन जण जखमी झाल्याची घटना 24 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी 16 आरोपींविरुद्ध दंगल व विविध कलमान्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका गटाच्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पहिल्या गटाची तक्रार : तीन जणांना अटक
पहिल्या गटातर्फे मनोज पांडुरंग चौधरी (32, रा.न्यू एरीया वॉर्ड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रशांत मुरलिधर बर्‍हाटे, किशोर चिंधू तळेले व काशीनाथ रामा कोलते यांच्यासह अन्य दोघा अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 24 रोजी साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान फिर्यादी मनोज यांचे काका वासुदेव बोंडे यांच्याशी आरोपींशी झालेल्या भांडणाच्या कारणातून संगनमताने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच बिअरच्या बाटलीच्या काचेच्या तुकड्यांनी उजव्या डोळ्याच्या बाजूस मारून गंभीर दुखापत करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.

दुसर्‍या गटाचीही तक्रार : 11 आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा
दुसर्‍या गटातफर्र्े किशोर छिंदू तळेले (हुडको कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी मनोज भालचंद्र चौधरी, चेतन शांताराम बाविस्कर, नितीन नारायण सरोदे, मुकेश संजय सरोदे, विपूल विलास सरोदे, शुभम शांताराम शिंदे, विकी आनंदा शिंदे, भैय्या पांडुरंग चौधरी, विकी जाधव, विशाल अशोक पवार, सुधीर कोळी (सर्व रा.न्यू एरीया वॉर्ड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 24 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वासुदेव बोंडे यांच्याशी का भांडण केले ? असे फिर्यादीने बोलल्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच आमच्या वाट्याला गेल्यास सोडणार नाही, अशी धमकीही देण्यात आली. मारहाणीत फिर्यादी किशोरसह साक्षीदार रोहित काशीनाथ कोलते जखमी झाला. तपास हवालदार मिलिंद कंखरे करीत आहेत.