भुसावळात दोन दुकाने फोडली : तिघे आरोपी जाळ्यात

0

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी 24 तासांच्या आत आवळल्या आरोपींच्या मुसक्या

भुसावळ : शहरातील आठवडे बाजारात शुक्रवारी मध्यरात्री दोन दुकाने फोडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत दोन्ही चोर्‍यांचा उलगडा करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोनू मोहन अवसरमल (22, रा.वाल्मिक नगर, भुसावळ), आकाश बाबुराव इंगळे (28, रा.राहुल नगर, भुसावळ), चेतन पुंजाजी कांडेलकर (29, रा.पंचशील नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

या दुकानांमध्ये झाली होती चोरी
19 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी शहरातील आठवडे बाजारातील अप्सरा दुकानामगल दिलीप घनश्याम उदासी (37, रा.हनुमान नगर, भुसावळ) यांच्या गोदामाचा पत्रा वाकवून त्यातील 59 हजार रुपये किंमतीचे बेंटेक्सचे दागिने लांबवले होते तसेच दुसरे तक्रारदार बिलाल शहा मुझ्झफर शहा (30, रा.गौसिया नगर, भुसावळ) यांच्या आठवले बाजारातील अप्सरा दुकानाच्या मागे असलेल्या गोदामातून 10 हजार रुपये किंमतीची साडीची लेस व लटकन असलेला माल लांबवला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना या चोरीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर व संशयीत आरोपी राहुल नगर भागात असल्याची माहिती कळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, किशोर महाजन, रमण सुरळकर, रवींद्र बिर्‍हाडे, तुषार पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, श्रीकृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, दिनेश कापडे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.