भुसावळात दारूची चोरटी वाहतूक : जामनेरचा आरोपी जाळ्यात

0

भुसावळ : दारूची चोरटी वाहतूक करणार्‍या जामनेरच्या इसमाच्या बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून 6 रोजी दुपारी 2.20 वाजता नाहाटा चौफुलीजवळून मुसक्या आवळल्या. शीतल साहेबराव पाटील (जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून अ‍ॅक्टीव्हा दुचाकी तसेच 14 हजार 400 रुपये किंमतीची मॅकडॉल कंपनीची विदेशी दारू जप्त करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला होता. आरोपी शीतल साहेबराव पाटील (32, रा.बजरंग पुरा, जामनेर) हा नाहाटा चौफुलीवरून आल्यानंतर दुचाकी (एम.एच.20 जे.सी.2556) च्या पुढे ठेवलेल्या बॉक्सची झडती घेतली असता त्यात 96 विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, तुषार पाटील, महेश चौधरी, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींनी केली. तपास पोलिस नाईक समाधान पाटील करीत आहेत.

Copy